Satara | शिरवळ येथे रिक्षा उलटून वृद्ध ठार, सून जखमी

खंडाळा, (प्रतिनिधी) – शिरवळ येथील बसस्थानकासमोर पुलावर सोमवारी मध्यरात्री 2.15 च्या सुमारास रिक्षा उलटून वसंत हरिभाऊ पोळ (वय 65, रा. बोरीव, पो. रहिमतपूर, ता.कोरेगाव) हे ठार झाले, तर त्यांची सून जखमी झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नवनाथ पोळ हे कुटुंबीयांसमवेत पनवेल (जि. रायगड) येथे राहतात. त्यांचे वडील आजारी असल्याने, त्यांना व कुटुंबीयांना घेऊन, ते रिक्षातून (एमएच-43-बीसी-8385) बोरीव येथे निघाले होते. रिक्षा शिरवळ हद्दीत आल्यावर, चालक नवनाथ पोळ यांचे नियंत्रण सुटून, रिक्षा महामार्गाच्या संरक्षक कठड्याला धडकून उलटली.
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी व शिरवळ रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वसंत पोळ यांना शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या अपघातात वसंत पोळ यांची सून जखमी झाली असून, तिला शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर वसंत पोळ यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत प्रीती पोळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरवळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक नयना कामथे तपास करत आहेत.





