जागतिक तिरंदाजी स्पर्धेत ओजसला दोन सुवर्णपदके

सातारा – येथील छत्रपती शिवाजी कॉलेजच्या बी. ए. भाग 1 या वर्गात शिकणाऱ्या ओजस प्रवीण देवताळे याने नुकत्याच झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत पुरुष वैयक्तिक व सांघिक स्पर्धेत भारताला 2 सुवर्णपदके मिळवून दिली. आजपर्यंत आंतरराष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत पाच सुवर्णपदके आणि अनेक राष्ट्रीय पदके ओजसने मिळविली आहेत. या अभूतपूर्व यशाबद्दल छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ओजस देवताळे याची सातारा शहरात गुरुवारी जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली.
ओजसने म्यूनिच (जर्मनी) येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत वैयक्तिक पुरुष गटात सुवर्णपदक प्राप्त केले. हा बहुमान मिळवणारा तो प्रथम भारतीय आहे. पॅरिस (फ्रान्स) येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने सांघिक गटात सुवर्णपदक मिळविले. या संघात ओजसचा समावेश होता. यापूर्वी त्याने तिरंदाजीमध्ये ज्युनियर वर्ल्डकपमधील आणि आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदके मिळवली आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या आशियाई व पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिंम्पिक स्पर्धेसाठी त्याचा सध्या कसून सराव सुरू आहे.
ओजस देवताळे याच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थ्यांनी त्याचे अभिनंदन केले. ओजस व त्याचे मार्गदर्शक प्रवीण सावंत यांची गुरुवारी दि. 31 रोजी छत्रपती शिवाजी कॉलेज ते कर्मवीर समाधी परिसर अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली.
पोवई नाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केल्यानंतर मिरवणूक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधी स्थळापर्यंत गेली. ओजस देवताळे व प्रवीण सावंत यांचा सत्कार रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख, सहसचिव बंडू पवार व प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. रयत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विजय कुंभार, जिमखाना विभाग प्रमुख प्रा. विक्रम ननावरे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.





