खनिज तेलाच्या दरात वाढ कायम; भारताला आयातीसाठी मोजावी लागणार जास्त किंमत

मुंबई : तेल आणि नैसर्गिक वायू साठे असलेल्या इराण व इस्रायलदरम्यानचा संघर्ष वाढत जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जागतिक खनिज तेल बाजारात अनिश्चितता पसरली आहे. त्यामुळे एक आठवड्यापासून खनिज तेलाचे दर एकतर्फी वाढत आहेत. भारत आपल्या गरजेच्या बहुतांश खनिज तेल आयात करीत असल्यामुळे भारताला यासाठी अधिक किंमत मोजावी लागणार आहे.
भारत जास्त प्रमाणात घेत असलेल्या ब्रेंट क्रुडचे दर गुरुवारी 0.25 टक्क्यांनी वाढून 76.89 डॉलर प्रति पिंप या पातळीवर गेले. एक महिन्यापूर्वी खनिज तेलाचे दर केवळ 70 डॉलर प्रतिपिंप या पातळीवर होते. यामध्ये वेगाने वाढ होताना दिसत आहे. गेल्या महिन्यात खनिज तेलाच्या किमती मापक होत्या. त्यामुळे केंद्र सरकारने अचानक खनिज तेलावरील उत्पादन शुल्कात वाढ केली होती.
यामुळे किरकोळ बाजारातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर कसलाही परिणाम झाला नव्हता. मात्र आता खनिज तेलाचे दर जास्त असल्यामुळे तेल शुद्धीकरण कंपन्यांना जास्त उत्पादन शुल्क पेलनार नाही. अशा परिस्थितीत हे उत्पादन शुल्क कमी केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. इराणमध्ये जगातील एकूण नैसर्गिक वायू पैकी निम्मा वायू असल्याचे समजले जाते. त्याचबरोबर इराणमध्ये मोठ्या प्रमाणात खनिज तेलाचे साठे आणि तेल शुद्धीकरण यंत्रणा आहे. इस्रायलने लष्करी ठाण्याबरोबरच तेल साठ्यावरही हल्ले केले आहेत.
यामुळे इराणमधील तेल साठ्यावर परिणाम झाला आहे. इराणच्या शेजारी देशांमध्येही तेलाचे आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन घेतले जाते. संघर्षामुळे या देशातील हवाई हद्दीत बंद आहेत. त्याचबरोबर समुद्रमार्गे वाहतुकीवरही परिणाम झालेला आहे. जहाजांचा विम्याचा खर्च वाढणार आहे. अशा परिस्थितीत जागतिक बाजारात तेलाचे दर वाढत आहेत.
भारताकडून आवश्यक उपाययोजना
बहुतांश खनिज तेल आणि वयू आखातातून येत असला तरी इतरही काही पर्यायी स्त्रोत आहेत. भारत सरकार इंधनाचा तुटवडा भासू नये यासाठी आवश्यक उपाययोजना निरंतर करीत आहे, असे गेल्या आठवड्यात केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरजीतसिंह पुरी यांनी सांगितले होते. या युद्धाचा भारतातील इंधनपुरवठ्यावर किंवा साठ्यावर आतापर्यंत तरी नकारात्मक परिणाम झालेला नाही. भविष्यातही होण्याची शक्यता कमी असल्याचे समजले जाते. मात्र तेल महागात पडण्याची शक्यता आहे.





