प्रभात वृत्तसेवा पुणे – जानेवारी २०२५ मध्ये होणाऱ्या पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून प्रभाग निहाय प्रारूप मतदार याद्या शुक्रवारी जाहीर करण्यात आल्या आहेत. प्रभाग रचनेत मोठ्या प्रमाणात मोडतोड झाल्यानंतर आता मतदार यादीतही मतदारांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात तफावत असून, प्रभाग क्रमांक ९ सूस- बाणेर- पाषाण १ लाख ६० हजार २४२ मतदारांसह संपूर्ण शहरातील सर्वात मोठा प्रभाग ठरला आहे. दुसरीकडे केवळ ६२ हजार २०५ मतदार असलेला प्रभाग ३९ अप्पर -सुप्पर इंदिरानंगर हा शहरातील सर्वात लहान प्रभाग ठरला आहे, तर एकूण मतदारांची संख्या सुमारे ३५ लाख ५१ हजार ४६१ असणार आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते या याद्या जाहीर करण्यात आल्या. अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, निवडणूक विभागप्रमुख प्रसाद काटकर या वेळी उपस्थित होते. या निवडणुकीसाठी १ लाखांपेक्षा अधिक मतदार संख्या असलेले तब्बल १० प्रभाग असून, या प्रभागांमध्ये मतदारांपर्यंत पोहोचताना आणि मतदार याद्यांचे नियोजन करताना राजकीय पक्ष, तसेच उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार आहे. या यादीवर २० ते २७ नोव्हेंबर या कालावधीमध्ये हरकती व सूचना दाखल करून घेण्यात येणार आहेत. ५ डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. मात्र, प्रभागांमध्ये मतदार संख्या प्रचंड वाढली असून, काही ठिकाणी ती ६० हजारांच्या खाली गेल्यामुळे आगामी निवडणुकीतील राजकीय समीकरणांवर याचा थेट परिणाम होण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. एक लाखापेक्षा अधिक मतदार असलेल्या प्रभागांची संख्या वाढली असून, अशा प्रभागांमध्ये उमेदवारांसमोर संपर्क, प्रचार आणि बूथ व्यवस्थापनाची मोठी आव्हाने असणार आहेत.