खडकवासला जलसंपदाच्या कार्यकरी अभियंत्याविरोधात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम

खडकवासला: खडकवासला जलसंपदाच्या विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांच्या विरोधात धरणांच्या सुरक्षेच्या कामात हालगर्जी, मनमानी कारभार, अशा गंभीर तक्रारी जलसंपदा विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. कुऱ्हाडे यांच्यावर कठोर कारवाई होईपर्यंत सोमवार (२५) पासून काळ्या फिती लावून काम करण्यास अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुरवात केली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कुऱ्हाडे या कार्यकारी अभियंता पदावर आहेत. तेंव्हापासून त्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना नाहक वेठीस धरून मनमानी करत आहेत. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करुनही दखल घेतली नाही, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या खडकवासला, पानशेत व वरसगाव या तीन धरणांच्या मान्सून पुर्व नियमित देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण न करणे, जुलै २०२४ मध्ये पुर व्यवस्थापनात अडथळा निर्माण करणे, अर्वाच्य भाषेत धमकावणे, बाहेरच्या लोकांकडून कर्मचाऱ्यां विरोधात खोट्या तक्रारी करणे, नियमबाह्य कामे करुन शासकीय आदेशांची पायमल्ली करणे आदी तक्रारी जलसंपदा विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी कुऱ्हाडे यांच्या विरोधात केल्या आहेत. या बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदनेही देण्यात आली आहेत.





