Nagar | आंदोलन थांबविण्यासाठी पाच कोटींची ऑफर : खा. लंके यांचा गौप्यस्फोट

नगर, (प्रतिनिधी) – पोलीस विभागातील स्थानिक गुन्हे शाखेत होत असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात खासदार नीलेश लंके यांनी सुरू केलेल्या उपोषणात दुसऱ्या दिवशीही जिल्हाभरातून अनेक तक्रारी आल्या आहेत. दरम्यान हे आंदोलन करू नये यासाठी मध्यस्थीसाठी मला फोन आले.
पाच कोटी रूपये देतो, महिन्यालाही पाकीट ठरवून देतो, अशी ऑफर देण्यात आली होती. असा गौप्यस्फोट खा. नीलेश लंके यांनी केला. जर हे लोक पाच कोटी रूपये देत असतील तर हे पैसे कुठून आले ? वाईट मार्गाने पैसे कमावून मनमानी पध्दतीने कारभार सुरू असल्याचे खा.लंके यांनी म्हटले.
पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेमधील भ्रष्टाचाराविरोधात खा. लंके यांचे दुसर्यादिवशी ही आंदोलन सुरु होते. यावेळी जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्य़ान आंदोलनातील मागण्यांसंदर्भात पोलीस अधीक्षकांशी दोनदा शिष्टमंडळाने चर्चाही केली, मात्र ती निष्फळ ठरली.
खा. लंके म्हणाले, आपण हाती घेतला विषय शेवटला नेला तरच या खात्यात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे. समाजाचे रक्षकच भक्षक झाले आहेत. सर्वसामान्यांना त्रास देण्याचे काम केले जात आहे. एका कर्मचाऱ्याची दहा ते बारा वर्षे एकाच ठिकाणी ठेवले जाते. गुन्हे शाखेतील निलंबित कर्मचारी ५०० दिवस गैरहजर असताना त्यास पुन्हा हजर करून घेतले जाते.
ज्या विभागातून निलंबित झाला त्याच विभागात सबंधित पोलीस निरीक्षक त्या कर्मचाऱ्याला त्या विभागात बोलवून घेतो. आर्थिक संबंधातून अशा अनेक गोष्टी केल्या जातात. त्याचे कागदोपत्री पुरावे आपल्याकडे आहेत असे त्यांनी सांगितले.
पाच टक्के लोकांमुळे पोलीस यंत्रणा बदमान
पाच टक्के लोकांमुळे इतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदनामी होत आहे. सामान्य पोलीस कर्मचारी रस्तावर राहतो, काम करतो त्यांना पगाराव्यतीरिक्त इतर कोणताही लाभ मिळाला नाही. चार सहा लोकांनी संपूर्ण पोलीस यंत्रणा बदनाम केली असल्याचे लंके म्हणाले.
लंके यांची प्रकृती स्थिर
जिल्हा रूग्णालयाच्या डॉक्टरांनी पोलीस विभागाकडून पत्र प्राप्त झाल्यानंतर खा. नीलेश लंके, त्यांच्यासोबत उपोषणास बसलेले नगरसेवक योगीराज गाडे, अशोक रोहोकले यांच्या प्रकृतीची तपासणी केली. लंके यांच्या रक्तातील साखर काहीशी वाढली असली तरी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. योगीराज गाडे यांचीही प्रकृती स्थिर असून अशोक रोहोकले यांच्या रक्तातील साखर मात्र वाढलेली आढळून आल्याचे वैद्यकिय पथकाने सांगितले.





