Jhimma 3 Teaser : ‘सहलीला जायचं, जायचं सहलीला…’ यावेळी पुरुषांची धमाल! ‘झिम्मा ३’च्या टीझरने उत्सुकता शिगेला
Jhimma 3 Teaser : 'सहलीला जायचं, जायचं सहलीला' म्हणत यावेळी पुरुष मंडळी श्रीलंकेच्या सफारीवर निघाली आहेत. इरादा स्टुडिओज प्रस्तुत आणि चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटात पुरुषांच्या मैत्रीचे, त्यांच्या स्वभावाचे आणि एकमेकांसोबत वेळ घालवताना घडणाऱ्या मजेशीर प्रसंगांचे दर्शन घडणार आहे.

Jhimma 3 Teaser : ‘झिम्मा’ आणि ‘झिम्मा २’ या चित्रपटांनी महिलांच्या मैत्रीची, नात्यांची आणि त्यांच्या स्वभावातील वेगवेगळ्या पैलूंची धमाल प्रेक्षकांना अनुभवायला दिली. आता याच लोकप्रिय चित्रपटाच्या तिसऱ्या भागातून एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्या ‘झिम्मा ३’चा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, यावेळी महिलांऐवजी पुरुषांची टोळी सहलीला निघणार आहे. त्यामुळे या भागात मनोरंजनाचा नवा तडका पाहायला मिळणार आहे.
यावेळी महिलांची नाही, तर पुरुषांची सहल!
‘सहलीला जायचं, जायचं सहलीला’ म्हणत यावेळी पुरुष मंडळी श्रीलंकेच्या सफारीवर निघाली आहेत. इरादा स्टुडिओज प्रस्तुत आणि चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटात पुरुषांच्या मैत्रीचे, त्यांच्या स्वभावाचे आणि एकमेकांसोबत वेळ घालवताना घडणाऱ्या मजेशीर प्रसंगांचे दर्शन घडणार आहे. टीझरमध्ये या सहलीची धमाल, कलाकारांमधील मजेशीर संवाद आणि वेगवेगळ्या स्वभावाच्या माणसांमधील जुगलबंदीची झलक पाहायला मिळते. त्यामुळे ‘झिम्मा ३’बाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
हेमंत ढोमेही झळकणार महत्त्वाच्या भूमिकेत
या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले आहे. विशेष म्हणजे यावेळी ते केवळ दिग्दर्शक म्हणूनच नव्हे, तर अभिनय करतानाही दिसणार आहेत. चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, हेमंत ढोमे, राजन भिसे, उदय सबनीस, सुयोग गोऱ्हे, अर्चित देवधर, सिद्धेश धुरी आणि अमेय वाघ अशी दमदार कलाकारांची फळी पाहायला मिळणार आहे.
श्रीलंकेच्या निसर्गरम्य ठिकाणी रंगणार धमाल
‘झिम्मा’च्या आधीच्या दोन्ही भागांमध्ये महिलांच्या सहलीतून मैत्री, नाती आणि भावविश्वाचे विविध रंग उलगडले होते. आता तिसऱ्या भागात पुरुषांच्या मैत्रीचा वेगळा पैलू समोर येणार आहे. वेगवेगळ्या स्वभावाची माणसं एकत्र आल्यावर होणारी मजा, गैरसमज, वाद आणि अनपेक्षित प्रसंग यांची मनोरंजक मेजवानी या चित्रपटातून मिळणार आहे. नववर्षाच्या मुहूर्तावर म्हणजेच १ जानेवारी २०२७ रोजी ‘झिम्मा ३’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे नव्या वर्षाची सुरुवात मनोरंजनाच्या धमाक्याने करण्यासाठी प्रेक्षकांना ही सहल मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.




