ओडिशाने केली केंद्रीय सशस्त्र दलांच्या १२ कंपन्यांची मागणी

भुवनेश्वर – नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी ओडिशाही सज्ज होत आहे. त्यासाठी त्या राज्याने केंद्र सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये १ हेलिकॉप्टर आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या १२ कंपन्या पुरवण्याच्या मागण्यांचा समावेश आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी दिल्लीत नक्षलग्रस्त राज्यांची विशेष बैठक घेतली. त्या बैठकीत ओडिशाचे मुख्यमंत्री मोहनचरण माझी यांनी राज्याच्या मागण्या मांडल्या.
सुरक्षा दलांनी छत्तीसगढमध्ये नक्षलींविरोधात जोरदार मोहिमांचे सत्र हाती घेतले आहे. त्यामुळे तेथील नक्षली आश्रयासाठी शेजारील ओडिशात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ती गृहित धरून ओडिशा राज्य मोर्चेबांधणी करण्यासाठी सरसावले आहे. प्रामुख्याने नक्षलविरोधी मोहिमांसाठी खास करून वापरले जाऊ शकणारे हेलिकॉप्टर उपलब्ध करण्याची त्या राज्याची आग्रही मागणी आहे.





