खालापूर, (वार्ताहर) – दिवसभर कडक ऊन आणि संध्याकाळी पडणारा मुसळधार पाऊस यामुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे खालापूर तालुक्यातील नागरिक हैराण झाले आहे. परिसरात सध्या सरासरीपेक्षा अधिकच्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हवेत वाढलेला उष्मा आणि आर्द्रता यांमुळे प्रचंड उकाडा जाणावत असून त्यामुळे खोपोली, खालापूर शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिक हैराण झाले आहे. उकाड्यापासून संरक्षण व्हावे यासाठी नागरिक सध्या पंखा, कूलर, एसीचा आधार घेत आहेत. सर्वांनाच ऑक्टोबर हिटचा प्रचंड त्रास होऊ लागला असून खालापूर येथील तापमान ३४ अंश सेल्सियस पर्यंत पोहोचले आहे. खालापूर तालुक्यात मागील आठवड्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आताही अनेक भागात दिवसभर ऊन आणि सायंकाळी पाऊस अशी परस्थिती आहे. यामुळे वातावरण उष्ण झाले असून नागरिकांच्या शरीरातून धामाच्या धारा निघत आहेत. ऑक्टोबर हिट म्हणजे… ऑक्टोबर महिन्यात दक्षिण-पश्चिम मान्सूनचे वारे कमकुवत होतात आणि हळूहळू माघार घेऊ लागतात. पावसाळा संपून हिवाळ्याला सुरुवात होण्याचा हा काळ असतो. हा बदल होत असताना जो संक्रमणाचा काळ असतो, तो ऑक्टोबर महिन्यात येत असतो. या दिवसांत पाऊस थांबलेला असतो, अशा वेळी आकाशातून सूर्याची किरणे सरळ धरतीला स्पर्श करत असतात. या किरणांमुळे जी उष्णता या महिन्यात वाढते त्या उष्णतेलाच ऑक्टोबर हिट संबोधले जाते.