October Heat: सप्टेंबरअखेरीस शहरात ऑक्टोबर हिटचा चटका
October Heat:

October Heat: शहरासह जिल्ह्यात मान्सूनने पाठ फिरविल्यामुळे कमाल तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे पुणेकरांना सप्टेंबरअखेरीस ऑक्टोबर हिटचे चटके जाणवू लागले आहेत.
शहरातील कमाल तापमानाने ३४ अंशांचा टप्पा ओलांडला असून, मंगळवारी (दि. २९) कोरेगाव पार्क येथे सर्वाधिक ३४.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. यंदाच्या हंगामात सप्टेंबर महिन्यात तापमान उच्चांकी पातळीवर पोहोचण्याची ही दुसरी वेळ आहे.
हवेतील आर्द्रता कमी होऊन हवामान कोरडे झाल्यामुळे आणि आकाश पूर्णपणे निरभ्र असल्यामुळे तापमानाचा पारा सरासरीपेक्षा ४ ते ५ अंशाने वाढत आहे. सामान्यतः सप्टेंबर महिन्यात मान्सून सक्रिय असल्याने पुण्याचे सरासरी कमाल तापमान २८ ते ३० अंशाच्या आसपास असते.
मात्र, यंदा मागील दोन महिन्यांपासून शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्याने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच शहरातील कमाल तापमान वाढू लागले होते.
महिनाभरातील केवळ चार ते पाच दिवस वगळता उर्वरित सर्व दिवसांत तापमान ३० अंशाच्या पुढेच नोंदवले गेले आहे. साधारण दहा दिवसांपूर्वी जिल्ह्यातील इंदापूर येथे या हंगामातील उच्चांकी कमाल तापमानाची नोंद झाली होती, त्यानंतर आता मंगळवारी कोरेगाव पार्क येथे शहरातील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली असून, मागील १० वर्षांतील उच्चांकी नोंद आहे.
दरम्यान, हवामान विभागाच्या नोंदीनुसार पुणे शहरातील सप्टेंबर महिन्यातील मागील १०० हून अधिक वर्षांतील सर्वकालीन ऐतिहासिक उच्चांकी कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस (१२ सप्टेंबर १९६६ रोजी) नोंदवला होता. येत्या काही दिवसांत मान्सून पुन्हा सक्रिय झाला नाही, तर तापमानाचा हा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे.




