Nagar | पेट्रोल पंपचालकाकडून ग्राहकांची अडवणूक

शनिशिंगणापूर, (वार्ताहर) – सोनई- घोडेगाव रोडवर इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या पेट्रोल पंपावर एक व दोन रुपयांची नाणी स्वीकारले जात नसल्याने नाईलाजाने कमी किंवा जास्त पेट्रोल टाकावे लागत आहे. पंपचालकाच्या मनमानी पद्धतीने ग्राहकांना भुर्दंड सोसावा लागत असून, या पंपावर कारवाईची मागणी ग्राहकांकडून होत आहे.
आपल्या मनमानी पद्धतीने पंपचालक वागत असल्याने तो एक व दोन रुपयांचे चलन स्वीकारात नाही. या पंपावर सुविधेचा अभाव दिसून येत आहे. टॉयलेटची सुविधा, वाहनात हवा चेक करण्याची सुविधा नाही. त्याचबरोबर बाटलीमध्ये या पंपावर पेट्रोल, डिझेल दिले जात नाही. गाडी घेऊन आल्यानंतरच डिझेल व पेट्रोल दिले जाते.
एखाद्याला घरगुती कामासाठी डिझेल, पेट्रोलची आवश्यकता असल्यास त्यांनी गाडी खरेदी करायची का? शेतकामासाठी, जनावरांच्या चाऱ्यासाठी कुट्टी मशीनला डिझेलची आवश्यकता असते, मात्र, या पंपाचालकाकडून गाडीतच डिझेल दिले जात असल्याने शेतकऱ्यांनी कुट्टी मशीन या पंपावर घेऊन जायचे का,
असा सवाल संतप्त शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन या पंपावर तत्काळ कारवाई करावी,अन्यथा अकोळनेर डेपोवर मोर्चा काढण्याचा इशारा संतप्त ग्राहकांनी दिला आहे.





