देवस्थानच्या जमीन कारभारावर आक्षेप

कोरेगाव मूळ येथे घेण्यात आली विशेष ग्रामसभा

उरळी कांचन- कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या विश्‍वस्तांनी ग्रामस्थांना विश्‍वासात न घेता देवस्थानच्या 31.50 एकर जमिनीपैकी 16.50 एकर जमीन एका शैक्षणिक संस्थेला परस्पर 40 वर्षांच्या भाडेकराराने व कधीही रद्द न होणाऱ्या कुलमुखत्यार पत्राने दि. 2 ऑगस्ट 2019 रोजी दिली आहे. त्यामुळे ग्रामस्थ व श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट विश्वस्तांमध्ये तीव्र स्वरुपाचा वाद उत्पन्न झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर सरपंच कविता सुरेश काकडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. आज, झालेल्या विशेष ग्रामसभेत या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करीत या करारावर आक्षेप घेतल्याचे उपसरपंच लोकेश कानकाटे, माजी सरपंच विठ्ठल शितोळे यांनी सांगितले.

याप्रसंगी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बापूसाहेब बोधे, सरपंच कविता काकडे, सुरेश भोसले, नाना शिंदे, आप्पा शिंदे, अशोक सावंत, ताराचंद कोलते, रामभाऊ कानकाटे, विलास कानकाटे, प्रतिम शितोळे, जलिंदर कड, आप्पासाहेब कड, धौर्यसिंग शितोळे, बबनराव कोलते, मानसिंगराव कड, प्रमोद बोधे, मुकिंदा काकडे, सुदर्शन कानकाटे, सचिन कड, आदेश शितोळे, निखिल पवार, योगेश गायकवाड तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टने जी जागा मूळ गावाची आहे. पण, देवस्थानच्या देखभालीसाठी श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या ताब्यात दिली आहे, अशा 31.50 एकर जमिनीपैकी 16.50 एकर जमीन ग्रामस्थांना किंवा ग्रामपंचायतीला विचारात न घेता परस्पर एका शैक्षणिक संस्थेला चाळीस वर्षाच्या भाडेकराराने व कधीही रद्द न होणाऱ्या कुलमुखत्यार पत्राने दिली आहे. या व्यवहारात गैरप्रकार झाला असण्याची शंका ग्रामस्थांना असल्याने याबाबत विचार करून निर्णय घेण्यासाठी सरपंच कविता सुरेश काकडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते.

या ग्रामसभेला सुमारे 133 ग्रामस्थ उपस्थित होते. हा व्यवहार बेकायदा आह तसेच या कराराला स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयात जाण्याची भूमिका घेण्याबाबत ग्रामसभेत ग्रामस्थांनी मंजुरी दर्शविली. संशयास्पद व्यवहाराबद्दल श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे विश्वस्तांवर फसवणुकीच्या आरोपाखाली फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा ठरावही मजूर करण्यात आला. याला विलास बबन कानकाटे यांनी मांडलेल्या ठरावाला ताराचंद साहेबराव कोलते यांनी अनुमोदन दिल्याचे लोकेश कानकाटे सांगितले. तसेच या बाबत योग्य मार्ग निघाला नाही तर आम्ही आंदोलन करू, असा इशारा विठ्ठल शितोळे यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.