Nagar | नेवासे मतदार संघातील १३ हजार मतदारांवर आक्षेप

नगर, (प्रतिनिधी) – केंद्रिय निवडणूक आयोगाच्या निर्दशनानुसार १ जुलै २०२४ या अर्हता तारखेवर आधारीत छायाचित्र मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. नेवासे तालुक्यातील सर्वाधिक १३ हजार मतदारांबाबत माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आक्षेप घेतला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळेस आक्षेप घेतलेल्या १९ हजार मतदारांची नावे वगळण्यात आली होती. त्यातील १३ हजार मतदारांची नावे पुन्हा विधान सभेसाठीच्या मतदार यादीमध्ये आली आहेत. याबाबत जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्याकडे तोंडी तक्रार केली आहे.
जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय तसेच संबंधित मतदान केंद्रावर एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.
निवडणूक आयोग जाहीर केलेल्या छायाचित्र मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमानुसार ६ ऑगस्ट २०२४ रोजी एकत्रिकृत प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी करण्यात आली.
दि. ६ ते २० ऑगस्ट दरम्यान दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी आहे. दि. २९ ऑगस्ट रोजी दावे व हरकती निकाली काढण्यात येणार आहेत. २९ ऑगस्ट, २०२४ रोजी अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणे तसेच डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यीची छपाई करण्यात आहे. ३० ऑगस्ट २०२४ रोजी अंतिम यादीची प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
नेवाशाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळेस नेवासे काही मतदारांबाबत आक्षेप घेतला होता. सुमारे १९ हजार मतदारांबाबत आक्षेप होता. काही मतदार हे दुसऱ्या तालुक्यातील रहिवाशी आहेत. विद्यार्थी म्हणून आलेले काहींना येथील मतदार केले.
आदी आक्षेप घेतले होते. बीएलओ मार्फत ही काही आक्षेप नोंदविण्यात आले होते. त्यानंतर १९ हजार मतदारांची नावे वगळली. आता यापैकी १३ हजार मतदारांची नावे पुन्हा मतदार यादीत आले आहेत, असा लेखी आक्षेप माजी आमदार मुरकुटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदविला आहे.
नागरीकांना नमुना ६,७,८ भरण्याची सुविधा भारत निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच मतदार यादीत आपले नाव तपासण्यासाठी www.ceo.maharashtra.gov.in आणि
www.electoralsearch.eci.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. या शिवाय नागरीकांना व्होटर्स हेल्पलाईन मोबाईल ॲप देखील नाव नोंदणी व नाव शोधण्यासाठी उपलब्ध आहे. मतदार नोंदणीचे अर्ज जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी कार्यालया या ठिकाणी देखील उपलब्ध आहेत. नागरीकांना कोणतीही अडचण असल्यास मतदार मदत क्रमांक १८००२२१९५० वर संपर्क साधवा. राहुल पाटिल, उपजिल्हाधिकारी, निवडणूक शाखा, अहमदनगर





