OBC protest Indapur | हैदराबाद गॅझेटवरून संतापाचा भडका ; इंदापूरमध्ये ओबीसींचा मोर्चा

प्रभात वृत्तसेवा
इंदापूर – राज्य सरकारकडून हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्याचा अध्यादेश काढण्यात आल्यानंतर ओबीसी समाजात असंतोष निर्माण झाला आहे. इंदापूर शहरातील मुख्य बाजारपेठेतून मोठा मोर्चा काढून ओबीसी समाजबांधवांनी या अध्यादेशाला तीव्र विरोध दर्शवला. यावेळी हा अध्यादेश तातडीने रद्द करावा, अशी मागणी करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
सोमवारी (दि. 8) इंदापूर शहरात ओबीसी नेते पांडुरंग शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आरक्षण आमच्या वाट्याचं… नाही कोणी लाटायचं… एकच पर्व… ओबीसी सर्व… उठ ओबीसी जागा हो.. आरक्षणाचा धागा हो ! अशा घोषणा देत शहरातून मोर्चा काढण्यात आला. यावेळी ओबीसी नेते पांडुरंग शिंदे, नवनाथ पडळकर, अनिता खरात, संजय शिंदे, अशोक देवकर, किरण गोफणे, अँड नितीन राजगुरू, अॅड. सचिन राऊत, गणेश जाधव, राजू गार्डे, बापजी भोंग,
अनिल लडकत, गोकुळ व्यवहारे, शिवाजी सातव, माऊली पाटील, वसंत करे, तुकाराम करे. मयूर शिंदे आदी सकल ओबीसी समाज बांधव उपस्थित होता. इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी निवेदन स्वीकारले. या मोर्चादरम्यान पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चौख बंदोबस्त ठेवला होता.




