Satara News : महाबळेश्वरमध्ये ओबीसी संघटनेचे आंदोलन

महाबळेश्वर : महाबळेश्वरमध्ये ओबीसी संघटनेने जोरदार आंदोलन करत मराठा आरक्षण अध्यादेशाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनास सुरुवात करण्यात आली. मुख्य बाजारपेठ मार्गे तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार सचिन मस्के यांना निवेदन देण्यात आले.
ओबीसी समाजाच्या म्हणण्यानुसार मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याचा राज्य सरकारचा निर्णय हा त्यांच्या आरक्षणाच्या अधिकारांवर गदा आणणारा आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमची काही हरकत नसल्याचे देखील निवेदनात म्हटले आहे.
ओबीसी संघटनेच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार, राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी काही विशिष्ट अटी लावायला हव्या होत्या. मात्र, अशा अटी वगळून सरसकट आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय ओबीसी समाजासाठी अन्यायकारक असून मूळ ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या अधिकारांवरच घाला घातला जात आहे.
ओबीसी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष भरत लोकरे म्हणाले, “राज्य सरकार सर्वांनाच मूर्ख बनवत आहे. या निर्णयामुळे ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व हिसकावून घेतले गेले आहे. ओबीसी समाज आता सुशिक्षित झाला असून सध्या सुरू असलेल्या अन्यायकारक परिस्थितीची त्याला पूर्णपणे जाणीव झाली आहे. त्यामुळे आम्ही रस्त्यावर आणि न्यायालयीन लढाई देण्याचा निर्धार केला आहे.
आंदोलनात ‘एकच पर्व, ओबीसी सर्व, जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे, जिसकी संख्या भारी, उतनी उसकी भागिदारी. अशा घोषणांनी भरपावसात वातावरण गरम झाल्याचे पहावयास मिळाले. यावेळी ओ.बी.सी.संघटनेचे तालुकाध्यक्ष, अनिल लोहार, नगरसेवक, संदीप साळुंखे, संदीप आखाडे, चंद्रकांत जंगम, काशिनाथ टेंबे, इक्बाल वारुणकर, ॲड. विठ्ठल कदम, प्रशांत कात्रट, प्रशांत आखाडे, कुमार शिर्के, आयुब वारुणकर, अनिल ढेबे तसेच ओबीसी बांधव उपस्थित होते.


