Laxman Hake : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना अटक; काय आहे प्रकरण?

पंढरपूर : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना पंढरपूर पोलिसांकडून अटक करण्यात आली. यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. पंढरपूर न्यायालयाने हाके यांना जामीन मंजूर केला आहे. प्राध्यापक लक्ष्मण हाकेंना पंढरपूर पोलिसांनी धनादेश अनादर प्रकरणी अटक करण्यात आली होती.
काय म्हणाले लक्ष्मण हाके?
लक्ष्मण हाके यांनी जामीन मिळाल्यानंतर मात्र आपल्याला अटक झाली नसल्याचा दावा केला आहे. मी जामीन घेतलाच नाही, रेग्युलर कोर्टाची केसची तारीख होती. मध्यंतरी उपोषणामुळे आपली कोर्टाची तारीख चुकली होती. त्यामुळे आजच्या तारखेला हजर झालो. मला अटक झाली नसल्याचे हाके म्हणाले आहेत.
कोण आहेत लक्ष्मण हाके ?
लक्ष्मण हाके हे आपल्या अनोख्या आंदोलनामुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांनी ओबीसी संघर्ष सेनेचे अध्यक्ष, ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाचे कार्याध्यक्षपदावर काम केले आहे. तर मागील काही वर्षात अनेक ओबीसी मोर्च्यांमध्ये ते सक्रिय सहभागी असल्याचे दिसून आले. लक्ष्मण हाके हे सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावचे रहिवासी आहेत. पुणे विद्यापीठातून त्यांनी एमएचं शिक्षण पूर्ण केलं आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात काही दिवस अध्यापनाचे कामही त्यांनी केले आहे.





