NZ vs ENG : न्यूझीलंडने रचला इतिहास! तब्बल ४२ वर्षांनंतर इंग्लंडला दुसऱ्यांदा दिला मोठा दणका

NZ vs ENG New Zealand created history : न्यूझीलंड क्रिकेट संघाने शनिवारी इतिहास रचत इंग्लंडला तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ३-० असे क्लीन स्वीप केले. वेलिंग्टन येथील स्काय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने दोन गडी राखून रोमांचक विजय मिळवला. न्यूझीलंड संघाच्या एकदिवसीय इतिहासात इंग्लंडला द्विपक्षीय मालिकेत ३-० ने हरवण्याची ही दुसरी वेळ ठरली असून, यापूर्वी हा पराक्रम कीवी संघाने ४२ वर्षांपूर्वी केला होता.
न्यूझीलंडने ४२ वर्षांनी केली इतिहासाची पुनरावृत्ती –
याआधी १९८३ मध्ये ज्योफ हॉवर्थ यांच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने इंग्लंडला ३-० ने पराभूत केले होते. त्या मालिकेतील पहिला सामना बे ओव्हल येथे ४ गडी राखून, दुसरा सामना हॅमिल्टन येथे ५ गडी राखून आणि तिसरा सामना २ गडी राखून जिंकला होता. सर्व सामन्यांत यशस्वी लक्ष्याचा पाठलाग करत न्यूझीलंडने विजय मिळवला होता.
पहिल्या गड्यासाठी ७८ धावांची भागीदारी –
तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडला ४०.२ षटकांत २२२ धावांवर रोखले आणि ४४.४ षटकांत ८ गडी गमावून २२६ धावा करत सामना जिंकला. लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांनी पहिल्या गड्यासाठी ७८ धावांची भागीदारी केली. कॉनवे ४४ चेंडूंमध्ये ३४ धावा करून धावबाद झाला, तर पुढच्याच षटकात रचिन रवींद्र ४६ धावा करून बाद झाला.
हेही वाचा – IND vs PAK : भारत-पाक पुन्हा एकदा येणार आमने-सामने! ‘या’ दिवशी रंगणार ब्लॉकबस्टर सामना
विल यंग १ धाव, विकेटकीपर टॉम लॅथम १० धावा, मायकेल ब्रेसवेल १३ धावा, कर्णधार मिचेल सँटनर २७ धावा आणि नॅथन स्मिथ २ धावा करून बाद झाले. डॅरिल मिचेलने ६८ चेंडूंमध्ये ४४ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. इंग्लंडकडून जेमी ओव्हर्टन आणि करन यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
तत्पूर्वी, इंग्लंड संघ ५० षटके पूर्ण न खेळता ४०.२ षटकांत २२२ धावांवर गारद झाला. इंग्लंडकडून जेमी ओव्हर्टनने सर्वाधिक ६८ धावा, तर विकेटकीपर जोस बटलरने ३८ धावा केल्या. न्यूझीलंडकडून टिकनरने ४ आणि डफीने ३ गडी बाद केले. विश्वविजेता इंग्लंडचा हा लाजिरवाणा पराभव ठरला असून, त्यांच्या एकदिवसीय फॉर्मवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.





