Sushma Andhare : ‘नग्नता वस्त्रांपेक्षा…’; अंधारेंचा रुपाली चाकणकरांवर पलटवार म्हणाल्या “पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे…”
Sushma Andhare : व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले की, आशा मिरगेसह काही महिलांनी कोणताही ठोस पुरावा नसताना त्यांच्याविरोधात बेताल विधान करून आरोप केले आणि त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला.

Sushma Andhare : अशोक खरात प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी वैयक्तिक कारणास्तव पदाचा राजीनामा दिला होता. या प्रकरणावरून त्यांच्यावर सातत्याने टीका होत असताना आता त्यांनी आरोप करणाऱ्यांविरोधात कायदेशीर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात चाकणकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसिद्ध करत आपली भूमिका स्पष्ट केली.
व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले की, आशा मिरगेसह काही महिलांनी कोणताही ठोस पुरावा नसताना त्यांच्याविरोधात बेताल विधान करून आरोप केले आणि त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. या सर्व आरोपकर्त्यांना दोन दिवसांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयातून नोटिसा पाठवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच, एका स्त्रीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात आपला लढा सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, चाकणकर यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना अंधारे म्हणाल्या की, चाकणकर यांनी “निधड्या छातीने लढणार” असल्याचे म्हटले असले तरी त्यावर भाष्य करण्याची गरज नाही. “नग्नता ही केवळ वस्त्रांची नसून विचारांचीही असते आणि ती प्रत्येकाने तपासून घ्यावी,” असा टोला त्यांनी लगावला.
हेही वाचा : Karla Fire : कार्ल्यात मंडप गोदामाला भीषण आग! ४० ते ५० लाखांचा माल जळून खाक, परिसरात खळबळ
पुढे बोलताना अंधारे यांनी या वक्तव्यामागील राजकीय संदर्भही उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर हे विधान करण्यात आल्याचे सूचित करत, पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हा प्रयत्न असू शकतो, अशी टीका त्यांनी केली.
याशिवाय, चाकणकर यांनी ज्या व्हिडिओद्वारे आपली भूमिका मांडली आहे, त्यावरील सोशल मीडिया प्रतिक्रिया आणि कमेंट्सही एकदा वाचाव्यात, असा सल्लाही अंधारे यांनी दिला.
रुपाली चाकणकरांनी निवेदनात काय म्हटलयं?
दरम्यान, आपल्या स्पष्टीकरणात रुपाली चाकणकर यांनी अशोक खरात हे आपले आध्यात्मिक गुरु होते, मात्र त्यांच्या कोणत्याही आर्थिक व्यवहारांशी आपला संबंध नव्हता, असे स्पष्ट केले. खरात प्रकरणात पहिल्या दिवसापासून आपण स्पष्ट आणि ठाम भूमिका घेतली होती. जमिनीच्या भागीदारीशी किंवा संबंधित व्यवहारांशी आपला काहीही संबंध नव्हता. तसेच, आपण कोणत्याही महिलेला खरात यांच्याकडे नेले नाही किंवा आपल्याकडे कोणतेही आक्षेपार्ह फोटो अथवा व्हिडिओ नव्हते, असेही त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा : PMPML Bus : कोट्यवधींचा खर्च करूनही प्रवाशी ताटकळत! ६ बीआरटी मार्ग असूनही अपुऱ्या बसेसमुळे पीएमपीचा बोजवारा






