Dadar BEST Bus Accident : ‘ब्रेक फेल नव्हे, तर….’; दादर बेस्ट बस अपघातात मोठी माहिती समोर
Dadar BEST Bus Accident : अपघातामुळे बसमधील विद्युत वायरिंग तुटल्याने बस प्रत्यक्ष चालवून तपासणी करणे शक्य नव्हते. त्यामुळे उभी असलेल्या बसची तांत्रिक तपासणी करण्यात आली.

Dadar BEST Bus Accident : दादरच्या प्लाझा परिसरात सोमवारी झालेल्या बेस्ट बस अपघाताबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर बसचे ब्रेक निकामी झाल्याचा दावा चालकाने केला होता. मात्र ताडदेव आरटीओच्या प्राथमिक अहवालात बसची ब्रेक प्रणाली आणि हँडब्रेक सुस्थितीत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे नव्हे, तर मानवी चुकीमुळे झाल्याचा संशय अधिक बळावला आहे.
सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास वीर कोतवाल उद्यानाजवळ ओलेक्ट्रा कंपनीच्या बेस्ट बसचा भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले होते. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
अपघातानंतर चालकाने बसचे ब्रेक निकामी झाल्याचे सांगितले होते. मात्र आरटीओ अधिकाऱ्यांनी बसची तपासणी केल्यानंतर ब्रेक आणि गिअर यंत्रणेमध्ये कोणताही दोष आढळून आला नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अपघातामुळे बसमधील विद्युत वायरिंग तुटल्याने बस प्रत्यक्ष चालवून तपासणी करणे शक्य नव्हते. त्यामुळे उभी असलेल्या बसची तांत्रिक तपासणी करण्यात आली. (Dadar BEST Bus Accident)
आरटीओ अधिकाऱ्यांच्या प्राथमिक निष्कर्षानुसार, चालकाने घाबरून चुकीचे नियंत्रण हाताळल्याने अपघात घडला असावा. चुकून एक्सिलरेटर दाबल्याने बसचा वेग वाढला आणि नियंत्रण सुटल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Dadar BEST Bus Accident)
हेही वाचा : Chandrapur Bribery Case : काम होताच ५ हजारांची लाच मागितली; आरोग्य विभागाचा कर्मचारी अडकला एसीबीच्या जाळ्यात
चालकावर गुन्हा दाखल (Dadar BEST Bus Accident)
दरम्यान, अपघातग्रस्त बस सध्या बेस्ट प्रशासनाच्या ताब्यात असून या घटनेच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. पोलिसांचा अंतिम अहवाल आल्यानंतर चालकाचा वाहन परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी चालक विकास पडावे यांच्याविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात तेही जखमी झाले असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अंतिम अहवाल आल्यानंतर गोष्टी स्पष्ट होतील (Dadar BEST Bus Accident)
सूत्रांच्या माहितीनुसार, 463 क्रमांकाची ही बस प्लाझा ते काळाकिल्ला मार्गावर धावते. पहिल्या बसथांब्याकडे जात असतानाच हा अपघात झाला. त्या वेळी बसमध्ये चालक, वाहक आणि बेस्टचे निरीक्षक एवढेच कर्मचारी उपस्थित होते. हँडब्रेक काढल्यानंतर बसने अचानक वेग घेतल्याचे समोर आले असून, पहिली धडक बसल्यानंतर मोठी दुर्घटना टाळण्यासाठी चालकाने बस प्लाझाच्या दिशेने वळविल्याची माहितीही समोर आली आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू असून अंतिम अहवालानंतर अधिक तपशील स्पष्ट होणार आहेत.
हेही वाचा : Skincare Tips: नाकावरील ब्लॅकहेड्स-व्हाईटहेड्स झाले त्रासदायक? स्वयंपाकघरातील ‘हा’ घटक ठरू शकतो रामबाण उपाय!





