माजी महिला नगरसेविकेचे विवस्त्र फोटो व्हायरल; राजकीय वर्तुळात एकच खळबळ

मुंबई : मुंबईच्या पनवेल शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. शहरातील एका नामांकित राजकीय पक्षाच्या महिला नगरसेविकेचे आक्षेपार्ह फोटो (विवस्त्र करून) सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नगरसविकेने स्वतः पनवेल शहर पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं काय घडलं?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलमधील माजी महिला नगरसेविका २०१७ मध्ये काही मैत्रिणींसोबत कामानिमित्ताने बाहेरगावी गेल्या होत्या. त्या ठिकाणी त्यांनी काढलेला एक सेल्फी स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अपलोड केला होता. २०१७ सालीच हा फोटो सोशल मीडियावर टाकण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी या नगरसेविकेला तिच्या एका मित्राचा फोन आला.
त्याने सांगितले, की तू काढलेले जुने फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत. ते फोटो भयंकर आहेत, बघून घे. त्यानंतर नगरसेविकेने स्वतः हे फोटो पाहिल्यावर त्यांना धक्का बसला. त्यांनी याबाबत घरातील सदस्यांनाही माहिती दिली आणि पनवेल शहर पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी तातडीने या घटनेची माहिती घेऊन फोटो मॉर्फ करून विवस्त्र अवस्थेमध्ये टाकणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.
सोशल मीडियावर असे आक्षेपार्ह फोटो शेअर केल्याने माझ्या मनात लज्जा उपस्थित झाली असून ज्या राजकीय पक्षाचे मी काम करते, त्या पक्षाची देखील बदनामी होत आहे. तसेच फोटोसह दिलेल्या मजकुरामुळे जातीय तेढ निर्माण होऊ शकते, असा आक्षेप घेत या नगरसेविकेने पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

