Stock Market Listing Rules : NTPC, SJVN आणि REC वर BSE-NSEचा दंड; 59.14 लाखांचा फटका, कंपन्यांनी मागितली माफी
Stock Market Listing Rules : संचालक मंडळ आणि समित्यांच्या रचनेशी संबंधित लिस्टिंग नियमांचे पालन न केल्याचा ठपका; NTPC, SJVN आणि RECवर स्वतंत्र दंड

Stock Market Listing Rules : सार्वजनिक क्षेत्रातील वीज कंपन्या NTPC, SJVN आणि REC यांना शेअर बाजारातील लिस्टिंग नियमांचे पालन न करणे महागात पडले आहे. BSE आणि NSEने या तिन्ही कंपन्यांवर एकूण सुमारे 59.14 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. संचालक मंडळ आणि त्याच्या समित्यांच्या रचनेशी संबंधित नियमांचे पालन न झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
NTPCला 10.73 लाखांचा दंड –
NTPCने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, लिस्टिंग नियमांमधील नियम 17(1) च्या कथित उल्लंघनाप्रकरणी BSE आणि NSEने कंपनीवर स्वतंत्रपणे 5,36,900 रुपये (GSTसह) दंड आकारला आहे. म्हणजेच NTPCवर एकूण 10,73,800 रुपयांचा दंड झाला आहे.
कंपनीने आपल्या उत्तरात NTPC ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असल्याचे स्पष्ट केले आहे. कंपनीच्या संचालक मंडळातील संचालकांची नियुक्ती आणि त्यांना हटवण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतींकडे असून, हा अधिकार विद्युत मंत्रालयामार्फत वापरला जातो. या कारणाचा आधार घेत NTPCने दोन्ही शेअर बाजारांकडे दंड मागे घेण्याची विनंती केली आहे.
SJVNवर 26.88 लाखांची कारवाई –
SJVNवर BSE आणि NSEने प्रत्येकी 13,44,020 रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे कंपनीवरील एकूण दंडाची रक्कम 26,88,040 रुपये झाली आहे.
SEBIच्या काही लिस्टिंग नियमांचे पालन न केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. दंड माफ करण्यासाठी BSE आणि NSEकडे विनंती करणार असल्याचे SJVNने म्हटले आहे.
RECलाही 21.54 लाखांचा दंड –
वीज क्षेत्रातील वित्तीय कंपनी RECलाही BSE आणि NSEकडून नोटिसा मिळाल्या आहेत. 30 जून 2026 रोजी संपलेल्या तिमाहीत संचालक मंडळ आणि त्याच्या समित्यांच्या रचनेशी संबंधित लिस्टिंग नियमांतील काही तरतुदींचे पालन न झाल्याचे या नोटिसांमध्ये नमूद आहे.
दोन्ही शेअर बाजारांनी RECवर स्वतंत्रपणे 10,77,340 रुपयांचा दंड आकारला आहे. त्यामुळे RECवरील एकूण दंड 21,54,680 रुपये आहे.
नेमका नियम काय?
तिन्ही कंपन्यांवरील कारवाईचा मुख्य संबंध संचालक मंडळ आणि त्याच्या समित्यांच्या रचनेशी संबंधित लिस्टिंग नियमांशी आहे. NTPCने विशेषतः नियम 17(1)चा उल्लेख करत आपली बाजू मांडली आहे. SJVN आणि REC यांनीही दंड माफ करण्यासाठी BSE आणि NSEसमोर आपले म्हणणे मांडण्याची भूमिका घेतली आहे.
एकूण दंड :
NTPC : 10.73 लाख रुपये
SJVN : 26.88 लाख रुपये
REC : 21.54 लाख रुपये
एकूण : सुमारे 59.14 लाख रुपये





