एनपीपीने मणिपूर सरकारचा पाठिंबा घेतला मागे

इंफाळ : मणिपूरमध्ये पुन्हा अशांत स्थिती निर्माण झाली असतानाच मोठी राजकीय घडामोड घडली. त्या राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारचा पाठिंबा नॅशनल पीपल्स पार्टीने (एनपीपी) मागे घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांना पत्र पाठवून 7 आमदार असणाऱ्या एनपीपीने आपला निर्णय कळवला. मागील काही दिवसांत मणिपूरमधील स्थिती आणखीच खालावली आहे.
त्या राज्यातील जनतेला यातना सहन कराव्या लागत आहेत. पेच सोडवण्यात आणि स्थिती पूर्वपदावर आणण्यात राज्य सरकारला सपशेल अपयश आल्याची आमची भावना आहे. सध्याच्या स्थितीचा विचार करून आम्ही राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेत आहोत, असे त्या पत्रात नमूद करण्यात आले. अर्थात, एनपीपीने उचललेल्या पाऊलामुळे मणिपूर सरकारला कुठलाही धोका पोहचणार नाही.
त्या राज्यात विधानसभेच्या एकूण ६० जागा आहेत. भाजपचे ३२ आमदार आहेत. त्या पक्षाच्या सरकारला जेडीयू आणि एनपीएफ या पक्षांचाही पाठिंबा आहे. जेडीयूचे ६, तर एनपीएफचे ५ आमदार आहेत. त्या संख्याबळामुळे राज्य सरकारची स्थिती भक्कम असल्याचे मानले जाते. भाजपकडे स्वत:च्या बळावर बहुमत सिद्ध करण्याइतके आमदार आहेत.





