आता धावत्या ट्रेनमधून काढता येणार पैसे; ATMची सुविधा असलेली भारतातील ठरली पहिलीच एक्सप्रेस

ATM In Railway | तुम्हाला जर ट्रेनमधून प्रवास करताना एटीएममधून पैसे काढायचे असले तर आता ती सुविधा तुमच्यासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. मुंबई ते मनमाड दरम्यान धावणाऱ्या मध्य रेल्वेच्या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये आता एटीएमची सुविधा असणार आहे.
भारतात पहिल्यांदाच ट्रेनमध्ये बसवण्यात आलेल्या एटीएमची यशस्वी चाचणी घेण्यात आली. आता प्रवासादरम्यानही प्रवाशांना रोख रक्कम काढण्याची सोय होणार आहे.
या चाचणीसाठी बँक ऑफ महाराष्ट्रने उपलब्ध करून दिलेल्या एटीएमचा वापर करण्यात आला होता. डब्याच्या मागील बाजूस असलेल्या तात्पुरत्या पॅन्ट्री स्पेसच्या क्युबिकलमध्ये एटीएम बसविण्यात आलं आहे. भारतीय रेल्वेच्या या सुविधेमुळे अशा प्रवाशांना मदत होणार आहे.
मध्य रेल्वेच्या मनमाड वर्कशॉपमध्ये आवश्यक तांत्रिक बदल करून एक खास कोच तयार करण्यात आला आहे. यामध्ये एटीएम बसवण्यात आले असून, हा कोच आता पंचवटी एक्स्प्रेसला जोडण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी ही एटीएम सेवा असलेली ट्रेन मुंबईत दाखल झाली.
हे एटीएम ‘एक्स्प्रेस’ सेवेच्या एसी चेअर कार कोचमध्ये बसवण्यात आले असून, लवकरच ही सेवा प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार आहे. चालत्या ट्रेनमध्ये एटीएम सुरळीतपणे कार्यरत राहावे यासाठी योग्य विद्युत प्रणाली आणि संरचनात्मक उपाययोजना करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. हा संपूर्ण उपक्रम योजना भारतीय रेल्वेच्या विद्युत व यांत्रिक विभागांच्या समन्वयातून राबवला जात आहे. विशेष म्हणजे, एटीएमची सुविधा असलेली ही पहिलीच एक्स्प्रेस ठरली आहे. ATM In Railway |





