नागपूर : शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी सरकारने बोलावलेल्या बैठकीत उपस्थित राहणार नसल्याची माहिती प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिली आहे. नंतर रामगिरी बंगल्यावर कूच करणार, असा अल्टिमेटम त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कड यांनी काढलेल्या महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चाला राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला आहे. हा मोर्चा नागपूरच्या दिशेने रवाना झाला आहे. पत्रकार परिषद घेत ते म्हणाले की, घराघरातून प्रत्येक शेतकरी जात, पात, पंथ, पक्ष बाजूला ठेवून येणार आहे. काल मुख्यमंत्री साहेबांशी मेसेजद्वारे चर्चा झाली आहे. त्यांना आम्ही सांगितले की, आज आम्ही येऊ शकत नाही. एक ते दीड लाख लोक नागपूरकडे येणार आहेत. आम्ही जर तिकडे गेलो तर इथले नेतृत्व कोण करणार, असे म्हणत त्यांनी राज्य सरकारने बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती दिली. आम्ही आमचे मुद्दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवले आहे. हीच योग्य वेळ आहे. मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करतो की, याशिवाय दुसरी कुठलीही योग्य वेळ नाही. त्यांनी चार ते पाच वाजेपर्यंत निर्णय घेतला पाहिजे. आम्ही त्यांची वाट पाहत आहोत. नंतर रामगिरी बंगल्यावर कूच करणार आहोत, असा इशारा त्यांनी दिला आहे. निर्णयाशिवाय आम्ही मागे हटणार नाही. लेखी स्वरूपाचे निर्णय घ्यावेत. काही ठिकाणी शासन निर्णय काढावे लागतील. काही ठिकाणी परिपत्रक काढावे लागतील, ते काढावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. आम्ही रायगडपासून उपोषण सुरू केले तेव्हापासून ही लढाई सुरू आहे. आज शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. त्यामुळे निर्णय घेणे फार महत्त्वाचे आहे.