आता आम्ही लाडक्या बहिणींच्या बाजूने काम करणार; राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांचे मत

मुंबई : आता आम्ही लाडक्या बहिणीची बाजू घेऊन काम करणार आहोत, असे जयंत पाटील म्हणाले. लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार नाहीत, यासाठी आमचा लढा राहणार असल्याचेही ते म्हणाले. लाडक्या बहिणींनो आम्ही तुमच्या मागे आहोत, असा विश्वासही त्यांनी दिला.
लाडक्या बहिणींनी तुम्हाला मते दिली आहेत, त्यांना तुम्ही शब्द दिला आहे, त्यामुळे एकदा दिले तर दिले, त्यांनी मते दिली आहेत, त्यामुळे बघून द्यायचे होते, आम्ही घाई करा म्हणत होतो का? असा खोचक टोला जयंत पाटील यांनी महायुती सरकारला लगावला आहे. लाडकी बहिणींसाठी पैसे बंद होणार नाही, यासाठी आम्ही पक्ष संघटनेच्या माध्यमातून तालुका-तालुका पातळीवर लढाई उभारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून सुमारे 5 लाख लाभार्थ्यांना वगळण्यात आले आहे. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असणाऱ्या 2 लाख 30 हजार महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. तसेच वय वर्षे 65 हून अधिक असणाऱ्या 1 लाख 10 हजार महिलांची नावेही या योजनेतून हटवण्यात आली आहेत.
कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या 1 लाख 60 हजार महिलांची नावेही लाडकी बहीण योजनेतून कमी करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण 5 लाख महिला लाभार्थ्यांची नावे या योजनेतून वगळण्यात आली आहेत.



