‘या’ राज्यात धर्मांतर करणाऱ्यांना आता फाशीची शिक्षा, मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

CM Mohan Yadav: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात निष्पाप मुलींची छेड काढणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद असून आता धर्मांतर करणाऱ्यांनाही फाशीच्या शिक्षेची तरतूद केली जाईल, असे मोहन यादव म्हणाले.
राजधानी भोपाळ येथील कुशाभाऊ ठाकरे सभागृहात राज्य ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले की, राज्यातील निष्पाप मुलींच्या छेडछाडीच्या प्रकरणी सरकार अत्यंत कठोर आहे. याप्रकरणी फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. आमचे सरकार गैरकृत्य करणाऱ्या कोणालाही सोडणार नाही. अशा लोकांना जगण्याचा अधिकार कोणत्याही परिस्थितीत द्यायचा नाही. जे धर्मांतर करवतील त्यांनाही फाशीची शिक्षा देण्याची व्यवस्था केली जात आहे.
धर्मांतर आणि गैरव्यवहार खपवून घेतले जाणार नाही – मोहन यादव
मुख्यमंत्री मोहन यादव पुढे म्हणाले की, धर्मांतर आणि गैरवर्तन कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. समाजात दुष्कर्माला चालना देणाऱ्या अशा समाजकंटकांना कठोरपणे सामोरे जाण्याचा सरकारने संकल्प केला आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री मोहन यादव यांनी राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाच्या बचत गटांच्या उत्पादनांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले आणि स्टॉल्सना भेट दिली. तसेच आजीविका मिशनच्या भोपाळ शहरात कार्यरत असलेल्या मोबाईल ऑरगॅनिक मार्केटच्या तीन वाहनांना त्यांनी हिरवा झेंडा दाखवला.





