पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून रात्री घनकचरा संकलन करण्यासाठी घंटागाड्या सोडल्या जाणार आहेत. विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या मागणीनुसार ४१ घंटागाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अधिका-यांनी सांगितली. पिंपरी-चिंचवड शहरात दररोज निर्माण होणारा सुमारे १२०० टन कचरा संकलीत केला जातो. त्यासाठी दररोज सकाळी साडेसात, आठ, साडेआठ यावेळेत कचरा गाड्या सोडल्या जातात. सकाळी लवकर कामानिमित्त घराबाहेर पडणा-या नागरिकांना कचरा टाकणे शक्य होत नाही. काही कुटुंबामध्ये पती-पत्नी असे दोघेही नोकरी करणारे आहेत. जर कामानिमित्त सकाळी लवकर बाहेर पडल्यास त्यांना गाडी दारात येऊनही कचरा टाकणे शक्य होत नाही. त्यातच काही भागातील नागरिक रस्त्यावर कचरा टाकत असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. रस्त्यावर टाकला जाणारा कचरा उचलण्यासाठी तसेच रस्त्यावर कचरा टाकला जाऊ नये, यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने रात्रीच्या कचरा गाड्या घरोघरी सोडण्याचे नियोजन केले आहे. ज्या भागात रस्त्यालगत कचरा टाकण्याचे प्रकार घडले आहेत, अशा भागात रात्रीच्या गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यानुसार सर्वच क्षेत्रीय कार्यालयांकडून रात्री सोडण्यासाठी गाड्यांची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार गाड्या सोडल्या जातील, अशी माहिती आरोग्य विभागाचे अधिकारी गणेश देशपांडे यांनी सांगितली. क्षेत्रीय कार्यालयनिहाय गाड्यांची मागणी अ – ४ ब – ४ क – १० ड – ७ इ – २ फ – ४ ग – ४ ह – ६ एकूण ४१