आता कोकण रेल्वेचा प्रवास अधिक जलद; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा

पणजी – कोकण रेल्वेचे विद्युतीकरणाचे काम 100 टक्के पूर्ण झाले असून आता कोकण रेल्वेचा वेग आणखी वाढला आहे. विद्युतीकरणानंतर आता कोकण रेल्वेतील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि जलद होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पाच नॅशनल हायवे प्रकल्प, सात रेल्वे प्रक्लपांचे लोकार्पण करण्यात आले आहे. याप्रसंगी केंद्रीय राजयमंत्री श्रीपाद नाईक उपस्थित होते. कोकण रेल्वेचा मार्ग हा खूपच आव्हानात्मक मानला जातो. याच्या वाटेवर अनेक दऱ्या आहेत ज्यात उतार आहेत आणि तिचा रेल्वेमार्ग अनेक वळणदार वाटांमधून जातो. अशा आव्हानांनी भरलेल्या रेल्वे मार्गातील विद्युतीकरणाचे काम गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित होते. मात्र, आता त्याचे शंभर टक्के विद्युतीकरण झाल्याने या रेल्वे मार्गावरील प्रवास अधिक वेगाने करता येणार आहे.
कोकण रेल्वेने विद्युतीकरण आणि दुपदरीकरणाच्या कामाचा वेग कायम ठेवत काम पूर्ण केले आहे. यासाठी पंतप्रधान मोदी तसेच रेल्वे मंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांनी देखील कोकण रेल्वेच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
रेल्वे मंत्रालयाने 2016 रोजी कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाला मंजुरी दिली होती. रत्नागिरी ते थिविम यादरम्यान विद्युतीकरण पूर्ण झाल्याने कोकण रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या 741 किलोमीटर मार्गांवर विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. या विद्युतीकरणासाठी एकूण 1287 कोटीं रुपये खर्च करण्यात आले आहे.
कोकण रेल्वे विद्युतीकरणामुळे गोव्याचा शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटकसह सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल. यामुळे प्रवासी आणि मालवाहतूक सुरळीत होईल, तसेच पर्यावरण रक्षणासाठी मदत होईल.
– श्रीपाद नाईक, केंद्रीय राज्यमंत्री
प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
– कोकण रेल्वे मार्गावर एकूण 91 बोगदे आहेत, ज्याची एकूण लांबी 84.496 किमी (एकूण मार्गाच्या 11%) आहे.
– एकूण मार्ग-740 किमी (महाराष्ट्र- 382 किमी, गोवा-106 किमी आणि कर्नाटक- 252 किमी)
– रेल्वेमार्ग लांबी – महाराष्ट्र- 970 किमी, गोवा- 163 किमी, कर्नाटक: 294 किमी
– विद्युतीकरणासाठीचा एकूण खर्च: 1,287 कोटी रुपये





