आता बसस्थानके होणार स्वच्छ व सुंदर; खास बक्षिसेही दिली जाणार

नगर – अस्वच्छेचे आगार बसलेले बसस्थानक आता स्वच्छ व सुंदर होणार आहे. त्यासाठी परिवहन महामंडळाने स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असून स्वच्छ व सुंदर बसस्थानकांना खास बक्षिसे देखील देण्यात येणार आहे. बसस्थानकांमध्ये दररोज हजारो प्रवाशी ये-जा करतात. परंतू या बसस्थानकांमध्ये स्वच्छतेचा अभाव असल्याने प्रवाशांना या स्थानकांमध्ये थांबणे देखील अवघड होते. परंतु आता या अभियानामुळे बसस्थानके स्वच्छ होणार आहेत.
राज्यातील स्थानकांना दोन कोटींची बक्षिसेही मिळणार आहेत. त्यामुळे आगामी काळात ही स्थानके सुंदर दिसणार आहेत. शहराशी ग्रामीण भागाची नाळ जोडण्यासाठी एसटीने वर्षानुवर्षे महत्त्वाची भूमिका बजावली. मध्यमवर्गीय, गरीब जनतेला एसटीशिवाय पर्याय नाही. अनेक गर्भश्रीमंत मंडळीही लांबच्या प्रवासाकरिता एसटीला पसंती देतात.
या पार्श्वभूमीवर बहुतेक ठिकाणची बसस्थानके जुनी आहेत. महामंडळाकडे एसटी बसची संख्याही कमी आहे, तर कर्मचाऱ्यांचीही अडचण आहे. साहजिकच, एसटीपुढे अनेक प्रश्न उभे असतात. त्यातून मार्ग काढत एसटीची चाके सतत गरगरत आहेत. महाराष्ट्राच्या विकासाला चालना देत आहेत.
मुख्यमंत्री, तसेच महामंडळाच्या संचालक मंडळाने सर्व स्थानके स्वच्छ करण्याबाबत निर्णय घेतला. त्यानुसार काही निर्देश देण्यात आले आहेत. स्वच्छता अभियानाचा कृतिआराखडा तयार करण्यात आला आहे. याचा कालावधी एक वर्षाचा असेल. राज्यात महामंडळाची 580 पेक्षा जास्त बसस्थानके आहेत. सर्वच स्थानके या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. बसस्थानकाची वर्गवारी करण्यात आली आहे. शहरातील “अ’, निमशहरी “ब’ आणि ग्रामीण भागातील बसस्थानके “क’ वर्गात आहेत.
राज्यातील महामंडळाचे मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर, अमरावती, नागपूर असे सहा प्रादेशिक विभाग आहेत. ही स्पर्धा दोन टप्प्यांत होईल. राज्यात दोन कोटींपेक्षा जास्त रकमेची बक्षिसे दिली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात अ, ब, क अशा वर्गवारीनुसार स्पर्धा होईल. दुसऱ्या टप्प्यात प्रादेशिक गटांमध्ये पहिल्या आलेल्या बसस्थानकांमध्ये स्पर्धा रंगेल. अंतिम तीन बसस्थानकांना बक्षिसाची रक्कम दिली जाईल.
स्पर्धेसाठी परीक्षक नियुक्त केले असून, दर दोन महिन्यांनी प्रत्येक बसस्थानकाचे परीक्षण करण्यात येईल. यामध्ये स्थानक परिसर, स्वच्छतागृहे, सुशोभीकरण, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, प्रवाशांसोबत सौहार्दाचे वागणे, वक्तशीरपणा अशा विविध घटकांचा यात समावेश असेल.
महामंडळ राबविणार स्वच्छता अभियान स्पर्धा
बक्षिसांची रक्कम – अ वर्ग प्रथम – 50 लाख चषक व प्रशस्तिपत्रक, ब वर्ग – प्रथम 25 लाख, चषक व प्रशस्तिपत्रक, क वर्ग – प्रथम 10 लाख, चषक व प्रशस्तिपत्रक





