आता संयुक्त गट ‘ब’ आणि ‘क’च्या स्वतंत्र परीक्षा; राज्य लोकसेवा आयोगाचा निर्णय

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीमार्फत घेण्यात येणारी गट ब आणि गट क ची संयुक्त परीक्षा आतापर्यंत एकत्र घेण्यात येत होती. परंतु आता यानंतर काळात गट ब आणि गट क ची संयुक्त परीक्षा वेगवेगळी घेण्याचा निर्णय एमपीएससीमार्फत घेण्यात आला आहे. दोन्ही परीक्षा स्वतंत्र झाल्यामुळे राज्यातील लाखो परीक्षार्थींनी संधी मिळणार आहे.
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब तसेच गट-क सेवा परीक्षेसाठी 19 जानेवारी, 2023 रोजी परीक्षा योजना प्रसिद्ध करण्यात आली होती. यातील तरतुदींनुसार महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब आणि गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली.
त्यानुसार दोन्ही सेवांची संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार होती. परंतु, निकाल प्रक्रियेदरम्यान आलेल्या तांत्रिक अडचणी, उद्भवलेली न्यायालयीन प्रकरणे तसेच निकाल प्रक्रियेस होणारा विलंब हे सगळं विचारात घेऊन या परीक्षा नियोजनात सुधारणा करण्याचा निर्णय आयोगाने घेतला.
महाराष्ट्र गट – ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आणि महाराष्ट्र गट – क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 या दोन्ही परीक्षांच्या जाहिराती आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. गट ब साठी 480 आणि गट क साठी 1333 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.





