मुंबई : मुंबईमध्ये आपल्या हक्काचे एखादे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र आजच्या घडीला मुंबईमध्ये घर घेणे प्रत्येकाला शक्य नाही आहे. त्यामुळे म्हाडा मुंबईकरांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असते. अलीकडेच म्हाडाने मुंबईत 2030 घरांची लॉटरी काढली आहे. यानंतर म्हाडाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. घरांसाठी अर्ज भरताना आता जुने म्हणजेच २०१८ पूर्वीचे डोमेसाईल प्रमाणपत्र (अधिवास दाखला) तात्पुरते ग्राह्य धरले जाणार आहे. मात्र, घराचा ताबा घेण्यापूर्वी संबंधित अर्जदाराला नवीन डोमेसाईल सादर करणे बंधनकारक असणार आहे. म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील सोडतीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.त्यामुळे शेकडो अर्जदारांना दिलासा मिळणार आहे. म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरताना सध्या १ जानेवारी २०१८ नंतर जारी केलेले आणि बारकोड असलेले डोमेसाईल प्रमाणपत्र बंधनकारक आहे. बारकोड असल्यामुळे सिस्टममधून या डोमेसाईल प्रमाणपत्राची पडताळणी करणे म्हाडाला सोपे जाते. मात्र आता म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरताना अर्जदार जुने डोमेसाईल प्रमाणपत्र अपलोड करू शकणार आहेत. नुकत्याच झालेल्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला असून पुढील सोडतीपासून याची अंमलबजावणी होणार आहे. सध्या म्हाडाने काढलेल्या लॉटरीत संबंधित अर्जदार विजेता झाल्यानंतर त्याला ठरावीक दिवसांची मुदत दिली जाईल आणि त्या मुदतीत त्याला बारकोड असलेले नवीन डोमेसाईल प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असणार आहे.