Postage Stamp : आता टपाल तिकिटावर झळकणार प्रियजनांचे छायाचित्र; आठवणींना खास स्वरूप देण्याची संधी
Postage Stamp : भारतीय टपाल विभागाची ‘माय स्टॅम्प’ योजना पुन्हा सुरू

पिंपरी – वाढदिवस, विवाह, लग्नाचा वाढदिवस किंवा अन्य खास प्रसंगासाठी प्रिय व्यक्तींना काहीतरी अनोखी भेट द्यायची असेल, तर भारतीय टपाल विभागाची ‘माय स्टॅम्प’ योजना एक उत्तम पर्याय ठरत आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना स्वतःचे, कुटुंबीयांचे किंवा मित्र-मैत्रिणींचे छायाचित्र असलेली टपाल तिकिटे तयार करून घेता येतात. त्यामुळे आठवणींना खास स्वरूप देण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
भारतीय टपाल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेत नागरिकांच्या छायाचित्रासह टपाल तिकिटांची निर्मिती केली जाते. ही तिकिटे नियमित टपाल पाठविण्यासाठी वापरता येतात. त्यामुळे वैयक्तिक आठवणी जपण्याबरोबरच त्यांचा प्रत्यक्ष उपयोगही करता येतो.
विशेषतः वाढदिवस, विवाह, विवाहाचा वाढदिवस, निवृत्ती समारंभ आणि विविध सण-समारंभांसाठी ही आकर्षक भेट ठरू शकते. ‘माय स्टॅम्प’ योजनेअंतर्गत एका पत्रकात १२ वैयक्तिक छायाचित्रांसह टपाल तिकिटे मिळतात. एका पत्रकाची किंमत ३०० रुपये आहे. त्यामुळे केवळ भेटवस्तू म्हणूनच नव्हे, तर स्वतःच्या आठवणी जपण्यासाठीही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी संबंधित टपाल कार्यालयाशी संपर्क साधावा. तेथे उपलब्ध सुविधेनुसार छायाचित्र देऊन वैयक्तिक टपाल तिकिटे तयार करून घेता येतात. नागरिकांनी या उपक्रमाची माहिती घेऊन आपल्या खास प्रसंगांना अधिक संस्मरणीय बनवावे, असे आवाहन टपाल विभागाकडून करण्यात येत आहे.
‘माय स्टॅम्प ही भारतीय डाक विभागाची एक अभिनव व ग्राहकाभिमुख सुंदर योजना आहे. ग्राहकाला स्वतःचा किंवा आपल्या प्रिय व्यक्तीचा फोटो तसेच संस्थेचा लोगो टपाल तिकिटावर छापून घेता येतो. वाढदिवस, विवाह, वर्धापन दिन या निमित्ताने आपण विशेष भेट आपल्या जवळच्या लोकांना देऊ शकतो.’ – काळुराम पारखी, जनसंपर्क अधिकारी पोस्ट कार्यालय चिंचवड.





