आता क्रीडामंत्रीच दिसणार क्रिकेटच्या मैदानावर; बंगालच्या संभाव्य रणजी संघात निवड

कोलकाता – क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी खेळाडूलाच क्रीडा मंत्रालय द्यावे, अशी चर्चा नेहमीच होते. आता चक्क क्रिकेटपटूच क्रिकेटच्या मैदानावर खेळताना दिसणार आहे. पश्चिम बंगालचे क्रीडामंत्री मनोज तिवारी यांची पश्चिम बंगालच्या संभाव्य रणजी संघात निवड करण्यात आली.
मनोज तिवारी यांची बंगालच्या संभाव्य रणजी संघात निवड करण्यात आली आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनने या संदर्भात निर्णय घेतला आहे. ममता बॅनर्जी यांच्या मंत्रीमंडळात सामील असलेल्या मनोज तिवारी यांनी खुद्द रणजी करंडक, विजय हजारे चषक, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी स्वत:ला उपलब्ध करून दिलं आहे. येत्या 23 जुलैपासून बंगालच्या फिटनेस शिबीराला सुरुवात होणार आहे.
या संदर्भात मनोज तिवारी यांनी म्हटलं की, खेळाविषयी मला आवड आहे. मी सध्या खेळाचा आनंद घेत आहे. तसेच मला बंगाल क्रिकेटला खूप योगदान द्यायचे आहे.
नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल निवडणूकीत तृणमूल कॉंग्रेसकडून मनोज तिवारी यांनी निवडणूक लढवली होती. यामध्ये त्यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांची क्रीडामंत्रीपदी वर्णी लागली.
रणजी संघात खेळण्यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. त्यांनी कोणतीही अडचण नसल्याचे सांगितलं. क्रिकेट माझं क्षेत आहे आणि आवडचही आहे. त्यामुळेच मी निवृत्ती जाहीर केली नसल्याचं मनोज तिवारी यांनी नमूद केलं.
मनोज तिवारी यांनी 12 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले आहे. यामध्ये एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. फिरकीपटू असलेल्या मनोज तिवारी यांनी 12 बळी घेतले आहेत. तसेच 3 टी-20 सामने देखील खेळले आहेत.





