भारतात काही कंपन्या ऑनलाइन फूड डिलिव्हरी करतात. यात झोमॅटो ही कंपनी प्रमुख आहे. ग्राहकांची ऑर्डर वेळेत पोहोचावी यासाठी झोमॅटो कंपनी वेगवेगळी शक्कल लढवत असते. आता फूड डिलिव्हरीसाठी झोमॅटो चक्क ड्रोनचा वापर करणार आहे. यासाठी झोमॅटोने हायब्रीड ड्रोनचे परीक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. फूड डिलिव्हरी करणारे ड्रोन दहा मिनिटांमध्ये पाच किलोमीटर, तर एका तासात 80 किलोमीटर इतकं अंतर कापतं.
हायब्रीड ड्रोनने पाच किलोपर्यंत पार्सल जेवण डिलिव्हरी करता येऊ शकते. हे ड्रोन्स पूर्णपणे स्वयंचलित असल्यामुळे फूड टॅम्परिंगचा धोकाही टळणार आहे. खरे तर मागील वर्षीच हवाई वाहतूक मार्ग संचलनालय (डीजीसीए) ने या ड्रोन्सचं परीक्षण केलं होतं.
रस्त्यावरून बाइकने फूड डिलिव्हरी केली जाते. हे काम वेळेत पूर्ण करणे म्हणजे तारेवरची कसरत. कारण पार्सल जेवण डिलिव्हरी करण्यास 20-30 मिनिटांचा कालावधी जातो. ड्रोनचा वापर केल्यास हा कालावधी निम्म्यापेक्षाही खाली येऊ शकतो. हे ड्रोन विशेषत: फूड डिलिव्हरीसाठीच निर्माण केले जात आहेत. त्यामुळे तुम्हाला जेवणाची ऑर्डर लवकरात लवकर मिळेल.