आता भाजपची वेट अँड वॉचच्या भूमिकेत -मुनगंटीवार

मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींबाबत रोज नवीनवीन ट्विस्ट समोर येत आहे. त्यातच आता भाजप, शिवसेना यांच्यानंतर आता राज्यपालांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला सत्तास्थापणेचे निमंत्रण दिले आहे. त्यावर भाजपकडून आता वेट अँड वॉचची भूमिका असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात सुरु असलेल्या घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि आमची भूमिका ही वेट अँड वॉचची आहे असे भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक काल पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे भाष्य केले आहे. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे भाजपाने सत्ता स्थापनेसाठी असमर्थता दर्शवल्यानंतर दुसरा मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी शिवसेनेला बोलावले. मात्र शिवसेनेला चोवीस तासांच्या आत त्यांचा दावा सिद्ध करता आला नाही.
Sudhir Mungantiwar, BJP: The BJP core team meeting has concluded. The political situation in the state was discussed in the meeting. On its basis, BJP is taking the stand of ‘wait and watch’. #Maharashtra pic.twitter.com/aC3yCqyDUr
— ANI (@ANI) November 11, 2019
आज दिवसभर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांच्याशी चर्चा करुनही शिवसेनेला त्यांच्या पाठिंब्याची पत्र मिळू शकली नाहीत. या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते राजभवनावर जाऊन राज्यपालांकडे गेले. आम्हाला मुदत द्या अशी मागणी त्यांनी केली मात्र ही मुदत त्यांना देण्यात आली नाही.
उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली तसंच सोनिया गांधी यांच्याशीही चर्चा केली. मात्र या सगळ्याचा उपयोग पाठिंबा मिळवण्यासाठी झाला नसल्याचेच दिसून आले. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसला सत्ता स्थापनेसाठी बोलवण्यात आलं आहे. त्यांना उद्या रात्री 8.30 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे.
आता ही मुदत देणे नाकारल्यानंतर तिसरा मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी राष्ट्रवादीला निमंत्रण दिले आहे. आता राष्ट्रवादी कॉंग्रेस याबाबत कॉंग्रेसशी चर्चा करण्यात येईल आणि आम्ही निर्णय घेऊ असे राष्ट्रवादीने म्हटले आहे. अशात भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक संपल्यावर आम्ही या सगळ्या घडामोडींवर वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे असे सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आहे.





