आता अपेक्षा “बीएस-6’मुळे ऑर्डर वाढण्याची

मंदीतली दिवाळी : उद्योजकांनी साजरा करावा लागला “ऋण काढून सण’
पिंपरी – यंदा दिवाळीवर मंदीचे सावट स्पष्ट जाणवत होते. गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून आर्थिक विवंचनेत अडकलेल्या लघु आणि मध्यम उद्योजकांना ऋण काढून आपल्या कामगार वर्गाची दिवाळी साजरी यावर्षी करावी लागली. बहुतेक उद्योजकांनी आर्थिक अडचणीत असतानाही आपल्या कामगारांना क्षमतेनुसार बोनस किंवा ऍडव्हान्स पेमेंट दिले. काही उद्योजकांना यासाठी बाहेरुन आर्थिक मदत घ्यावी लागल्याचेही अनेक उद्योजकांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना सांगितले.
उद्योगनगरीची दिवाळी दरवर्षी धूमधडाक्यात असते. गेली पाच ते सात वर्षे वाहन उद्योग आणि वाहन उद्योगावर आधारित लघु व मध्यम उद्योगांसाठी तेजीची होती. या तेजीच्या काळात दिवाळी जोरात साजरी केली जायची. परंतु यावर्षी वाहन उद्योगांना आठ महिन्यांपासून ब्रेक लागला होता.
दरवर्षी दिवाळीपूर्वी उद्योगांमध्ये ऑर्डर पूर्ण करण्यासाठी प्रचंड लगबग पहायला मिळायची, परंतु यावर्षी उद्योजकांना ऑर्डरची वाट पहावी लागत होती. दरम्यान गेल्या काही महिन्यांमध्ये वाहनांची विक्री घसरल्याने बड्या वाहन उत्पादक कंपन्यांनी अनेकदा उत्पादन बंद केले होते. पर्यायाने या बड्या कंपन्यांना सुटे भाग पुरविणाऱ्या लघु आणि मध्यम उद्योगांची आर्थिक परिस्थिती बिघडू लागली. बीएस-4 इंजिन असलेल्या वाहनांचा स्टॉक वाढण्यास नुकसान होऊ शकते, या भीतीने कंपन्यांनी उत्पादनावर ब्रेक लावल्याने लघु आणि मध्यम उद्योगांनाही ब्रेक लागला आहे.
“जीएसटी’ कमी करावा – संदीप बेलसरे
पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना सांगितले की, अतिशय बिकट परिस्थितीतही उद्योजकांनी आपल्या कामगारांना नियमानुसार बोनस, ऍडव्हान्स पेमेंट दिले आहे. परिस्थिती एकसारखी राहत नसते, तेजी-मंदीचे चक्र सुरुच असते. जागतिक मंदी असल्याचा परिणाम आपल्यालाही जाणवत आहे. परंतु पुन्हा परिस्थिती बदलेल, यामुळे कामगार वर्ग सांभाळून ठेवणे गरजेचे असते. या मंदीशी लढण्यासाठी सरकारने वाहनांवरील जीएसटी कमी करणे गरजेचे आहे. सर्व प्रकारचे कर आणि शुल्क पाहता आज प्रत्येक वाहनाच्या मूळ किंमतीच्या सुमारे 43 टक्के कर व शुल्क सरकारी तिजोरीत जमा होत आहेत. यामुळे सरकारने जीएसटी दरात कपात करुन उद्योगांना दिलासा देण्याची गरज आहे.
अंदाज घेऊनच उत्पादन
स्थानिक उद्योजकांनी दिलेल्या माहितीनुसार बीएस-4 इंजिनची वाहने एप्रिल 2020ला बंद होणार असल्याने वाहन उत्पादक कंपन्या अंदाज घेऊनच उत्पादन करत आहेत. असलेला स्टॉक संपविण्याकडे कंपन्याचा कल असून शोरुम आणि ऑनलाइनच्या माध्यमातून होणाऱ्या “इन्क्वायरी’चा अंदाज घेऊनच उत्पादन केले जात आहे. यामुळे लघु आणि मध्यम उद्योगांना मिळणाऱ्या ऑर्डरमध्ये मोठी कमतरता निर्माण झाली आहे.
स्थिती पूर्ववत होण्याची आशा
बीएस-6 इंजिन असलेल्या वाहनांची निर्मिती लवकरच सुरू होईल, अशी अपेक्षा असून या डिसेंबरपासून लघु आणि मध्यम उद्योगांना त्या दृष्टीने ऑर्डर मिळण्याची शक्यता उद्योजक व्यक्त करत आहेत. बीएस-6 इंजिन असलेल्या वाहनांचे उत्पादन सुरू झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील उद्योगांची स्थिती पूर्ववत होण्याची शक्यता आहे.





