Nagar | आता युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजणा

नगर, (प्रतिनिधी) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारकडून विविध योजणा आणल्या जात आहे. महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजणा, तर ६० वर्षांपुढील ज्येष्ठासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची घोषणा केली आहे. आता १८ ते ३५ वय असणार्या युवकांसाठी शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु केली आहे. आता युवाकांना प्रशिक्षण देवून बेरोजगारी कमी करण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे.
दरम्य़ान या योजणेची जिल्ह्यात अधिकाधिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देत योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन जिल्हा अग्रेसर राहील यादृष्टीने सर्व विभागांनी एकत्रित व समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीबाबत आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते. यावेळी कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक संचालक निशांत सुर्यवंशी यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी, विविध कंपन्या, जिल्ह्यातील औद्योगिक संघटना, खासगी आस्थापनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत तयार केलेल्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातुन रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करुन देणारे उद्योजक जोडले जातील. रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातुन मिळुन त्यांची क्षमतावाढ होईल. तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ या माध्यमातुन मिळणार आहे.
१८ ते ३५ वय असलेल्या युवकांना योजनेमध्ये सहभागी होता येणार आहे. योजनेंतर्गत १२ वी पास असणाऱ्या युवकांना ६ हजार रुपये, आय.टी.आय अथवा पदविका धारकांना ८ हजार रुपये तर पदवीधर, पदव्युत्तर युवकांना १० हजार रुपये शासनाकडुन डीबीटीद्वारे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये विद्यावेतन सहा महिन्यांसाठी देण्यात येणार आहे.
अतिरिक्त विद्यावेतन देण्यास आस्थापनांना मुभा राहणार आहे. योजनेंतर्गत खासगी क्षेत्रातील आस्थापना-उद्योजकाकडे एकुण कार्यरत मनुष्यबळाच्या १० टक्के व सेवा क्षेत्रासाठी २० टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सहकारी साखर कारखाने, दुध डेअरी, सहकारी सोसायटी तसेच विविध लघु व मध्यम उद्योग, विविध बँका, शासकीय, निमशासकीय आस्थापना आहेत. या आस्थापनांना सातत्याने कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासते. या सर्व आस्थापनांसोबत एकत्रित बैठक घेण्यात येऊन त्यांच्याकडुन त्यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची माहिती एकत्रित करण्यात येऊन मागणीनुसार युवकांना रोजगारच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी दिले.





