Athletics : आता लक्ष्य… टोकियो वर्ल्ड चॅम्पियनशिपचे… – नीरज चोप्रा

सोनीपत :- भारताचा स्टार भालाफेकपटू असलेल्या नीरज चोप्राने आगामी हंगामासाठी १०० टक्के तंदुरुस्त राहून २०२५ मध्ये होणाऱ्या टोकियो वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पोडियमवर स्थान मिळविण्याचे लक्ष्य असल्याचे सांगितले. नुकत्याच ब्रुसेल येथे झालेल्या डायमंड लीगमध्ये दोन वेळेसच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या नीरजला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.
सध्याचा हंगाम संपल्याने तो मायदेशी परतला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणाऱ्या नीरज चोप्राने पॅरिसमध्ये रौप्यपदकावर आपली मोहोर लावली होती. सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदक जिंकणारा तो पहिला ट्रॅक व फिल्ड एथलीट ठरला होता. हरियाणा स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीने ‘मिशन ऑलिंपिक २०३६’ संदर्भात आयोजित केलेल्या कॉन्फरन्समध्ये नीरज चोप्राने संवाद साधला.
दुखापतीतून सावरत असलेल्या नीरजचा विश्वास…
यावेळी त्याने बोलताना सांगितले की, पुढच्या हंगामासाठी जागतिक अजिंक्यपद हेच सर्वात मोठे लक्ष्य आहे. त्याच्या तयारीला आतापासून सुरुवात केली आहे. ऑलिम्पिक हे नेहमीच मनात असते, मात्र त्याच्यासाठी अजून चार वर्षे आहेत, असे तो बोलताना म्हणाला.
गेल्या वर्षभरात नीरज स्नायूंच्या दुखापतींशी झगडत होता. त्यामुळेच ऑलिम्पिक व डायमंड लीगच्या अंतिम फेरीत त्याच्या कामगिरीवर परिणाम झाला. डायमंड लीगच्या अंतिम फेरीत तो डाव्या हाताने खेळला. दुखापतीसाठी शस्त्रक्रिया करावी लागणार की नाही, हे डॉक्टराशी सल्लामसलत करणार असल्याचे चोप्राने सांगितले.
तांत्रिक सुधारणांवर भर देणार…
कदाचित दुखापतीमुळे तांत्रिक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याच्यावर काम सुरु आहे. तंत्र सुधारण्यावर माझा भर असणार आहे. मला भारतामध्ये सराव करायला आवडतो, मात्र स्पर्धा काळात परदेशात सराव करणे अधिक चांगले असते, असे नीरजने बोलताना सांगितले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने चांगली कामगिरी केली आहे, येणाऱ्या काळात देखील आमची कामगिरी अजून चांगली होईल, असा विश्वास नीरजने बोलताना व्यक्त केला.





