Cincinnati Open 2022 : जोकोविच ‘या’ कारणामुळे ‘सिनसिनाटी ओपन’मधून आऊट…

सिनसिनाटी – सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या सिनसिनाटी ओपन स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. त्याने कोविड-19 लसीचा एकही डोस न घेतल्याने त्याला अमेरिकेत प्रवेश करण्याची परवानगी मिळालेली नाही. तसेच न्यूयॉर्कमध्ये 29 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या वर्षातील शेवटच्या ग्रॅंड स्लॅम स्पर्धा यूएस ओपनमध्येही प्रवेश मिळण्याची शक्यता नाही.
तब्बल 21 वेळा ग्रॅंड स्लॅम विजेता जोकोविच हा विक्रमासाठी राफेल नदालच्या एक पाऊल मागे आहे. सध्या लसीकरण न केलेले परदेशी नागरिकांना कॅनडा किंवा यूएसमध्ये प्रवेश दिला जात नाही.
याबाबत जोकोविच म्हणाला, मी अजूनही यूएस ओपनमध्ये प्रवेश मिळण्याची आशा बाळगून आहे; परंतु त्यासाठी सरकारी धोरणात बदल करणे आवश्यक असल्याचे त्याने सांगितले. जोकोविचने तीन वेळा यूएस ओपनचे जेतेपद पटकावले आहे.
या स्पर्धेतून गतविजेत्या अलेक्झांडर झ्वेरेव्ह, गाएल मोंफिल्स, रिली ओपेल्का आणि डोमॅनिक थीम हे दिग्गज खेळाडूदेखील दुखापतीमुळे बाहेर पडले आहेत.
दरम्यान, नोव्हाक जोकाविच करोनाची लस न घेतल्यामुळे यापूर्वी देखील वादात सापडला होता. याआधी जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनवेळीही करोनाची लस घेतली नव्हती. ज्यामुळे त्याला स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले होते.





