Novak Djokovic Record : ऑल इंग्लंड क्लबवर नोव्हाक जोकोविचने रचला इतिहास! रॉजर फेडररचा विम्बल्डनमधील ‘तो’ विराट रेकॉर्ड मोडला
Novak Djokovic Record : नोव्हाक जोकोविचने विम्बल्डन २०२६ मध्ये ऐतिहासिक कामगिरी करत महान टेनिसपटू रॉजर फेडररचा सर्वात मोठा रेकॉर्ड उद्ध्वस्त केला आहे.

Novak Djokovic Break Roger Federer Record Wimbledon 2026 : टेनिस जगताचा सम्राट नोव्हाक जोकोविचने विम्बल्डन २०२६ मध्ये ऐतिहासिक कामगिरी करत महान टेनिसपटू रॉजर फेडररचा सर्वात मोठा रेकॉर्ड उद्ध्वस्त केला आहे. ७ वेळा विम्बल्डन चॅम्पियन राहिलेल्या जोकोविचने १३२ व्या मानांकित रोमन सफिउलिनचा पराभव करत ऑल इंग्लंड क्लबवरील आपला १०६ वा विजय नोंदवला. यासह त्याने फेडररच्या १०५ विजयांचा विक्रम मागे टाकत विम्बल्डनच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारा पुरुष खेळाडू बनण्याचा मान मिळवला. मात्र, या ऐतिहासिक सामन्यादरम्यान जोकोविचच्या रागाचा थरार आणि प्रेक्षकांचा रोषही पाहायला मिळाला.
पहिल्या सेटमध्ये दमदार पुनरागमन; मैदानात शिवीगाळ अन् राडा
हा ऐतिहासिक टप्पा गाठण्यासाठी ३९ वर्षीय जोकोविचला प्रचंड घाम गाळावा लागला. त्याने हा सामना ७-६(६), ६-३, ३-६, ६-३ असा जिंकला. पहिल्या सेटमध्ये ५-२ अशा फरकाने मागे असलेल्या जोकोविचने दोन सेट पॉईंट वाचवून सामना टायब्रेकरमध्ये नेला आणि सेट जिंकला. मात्र, तिसऱ्या सेटमध्ये सर्व्हिस गमावल्यानंतर जोकोविचचा संयम सुटला. त्याने कथितरित्या अपमानास्पद भाषा (शिवीगाळ) वापरली, ज्यासाठी पंचांनी त्याला अधिकृत ताकीद दिली. हा सेट गमावल्यानंतर त्याने रागात चेंडू थेट दूर फेकून मारला, ज्यामुळे संतप्त झालेल्या प्रेक्षकांनी त्याला मैदानात हुसकले. मात्र, सामन्यानंतर जोकोविचने माफी मागत भावनांवर नियंत्रण न राहिल्याचे कबूल केले.
१७ व्यांदा क्वार्टर फायनल; फेडररच्या ८ व्या जेतेपदाच्या जवळ –
No man has won more matches at Wimbledon, ever.
Novak Djokovic overtakes Roger Federer’s record to secure a historic 106th gentlemen’s singles win at The Championships 👑 pic.twitter.com/sJ6Ee5nt7u
— Wimbledon (@Wimbledon) July 5, 2026
या विजयासह जोकोविचने १७ व्यांदा विम्बल्डनची उपांत्यपूर्व (क्वार्टर फायनल) फेरी गाठली आहे. आता रॉजर फेडररच्या ८ विम्बल्डन जेतेपदांच्या जागतिक विक्रमाची बरोबरी करण्यापासून जोकोविच अवघे तीन विजय दूर आहे.
गतविजेती बार्बोरा क्रेजकोव्हा बाहेर; महिला टेनिसमध्ये सलग ९ व्यांदा नवा चॅम्पियन मिळणार –
En Wimbledon(Ronda4)Japonesa Naomi Osaka(14) a Bielorrusa, Aryna Sabalenka(1)6-2/7-6; Naomi 2-3 vsAryna,3revés linea,victoria 2018;Checas, Karolina Muchova(9) a Barbora Krejcikova(38)7-5/6-7/6-3; Karolina igualó a 2 con Barbora, campeona 2024.En 4toFinal, Osaka(3) vs Muchova(3). pic.twitter.com/kkKm4raMYT
— Bournigal Sports (@BournigalSports) July 5, 2026
महिला एकेरीत यावर्षी विम्बल्डनला सलग नवव्यांदा एक नवीन विजेती मिळणार आहे. गतविजेती आणि २०२४ ची चॅम्पियन बार्बोरा क्रेजकोव्हा हिचा चौथ्या फेरीत चेक प्रजासत्ताकच्याच कॅरोलिना मुचोव्हाने ७-५, ५-७, ६-३ असा पराभव करून तिला स्पर्धेतून बाहेर केले. इगा स्वियाटेक आणि रायबाकिना आधीच बाहेर पडल्यामुळे क्रेजकोव्हा ही एकमेव माजी विजेती शिल्लक होती, जी आता बाद झाली आहे. २०१६ मध्ये सेरेना विल्यम्सने तिचे सातवे विजेतेपद पटकावल्यापासून, कोणत्याही महिला खेळाडूला विम्बल्डनचे जेतेपद सलग दुसऱ्यांदा किंवा एकापेक्षा जास्त वेळा जिंकता आलेले नाही.





