कुख्यात गुंड निलेश घायवळवर कुस्तीच्या फडात हल्ला; पैलवानाने थेट कानशिलातच लगावली, VIDEO VIRAL

Pune | भूम तालुक्यातल्या आंदरूड गावात पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. निलेश घायवळ एका पैलवानाची भेट घ्यायला गेला असताना अचानक दुसरा पैलवान घायवळच्या अंगावर धावून गेला. त्या पैलवानाने निलेश घायवळला मारहाण केली आहे. ही मारहाण कुस्ती स्पर्धेवेळी झाल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भूम तालुक्यातील आंदरुड या गावात ग्रामदैवत जगदंबा देवीच यात्राउत्सव सुरू आहे. या यात्रेनिमित्ताने कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी घायवाळ आला होता. कुस्ती स्पर्धेत सहभागी झालेल्या एका पैलवानाची भेट घ्यायला घायवळ गेला. त्यावेळी अचानक एका पैलावान त्याच्या अंगावर येत कानशिलात लगावली. यानंतर घायवळ याच्या समर्थकांनी देखील संबंधित पैलवानाला मारहाण केली असल्याचे समजते. मात्र, या मारहाणीचे कारण समजू शकलेले नाही.
गावात आयोजित करण्यात आलेली कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक आले होते. मारहाणाच्या घटनेमुळे एकच गोंधळ यावेळी उडाला. निलेश घायवळ याला मारहाण करणारा पैलवान घटनास्थळावरून फरार झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.





