लक्षवेधी : रिव्हर्स इंजिनिअरिंगचा वापर

– नित्तेंन गोखले
चीन इतर देशांतील लोकप्रिय उत्पादनांची हुबेहूब नक्कल करून तेच कमी किमतीत जागतिक बाजारपेठेत विकत आहे. असे असले तरी चीनला पुरवठासाखळीतून काढून टाकणे अशक्यप्राय आहे.
दुसर्यांनी विकसित केलेल्या विद्यमान तंत्रज्ञानाचा पाया म्हणून वापर करून ड्रॅगन देशातील कंपन्या स्वतःची उत्पादने बनवतात. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) अॅप्स, सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म, स्मार्टफोन, सौर पॅनेल, बॅटरी, इलेक्ट्रिक वाहने, आधुनिक उत्पादन उपकरणे असो किंवा मुलांची खेळणी आज चिनी कंपन्यांनी प्रत्येक बाबींवर वर्चस्व मिळवले आहे. अनेक वर्षांपासून आशियाई ड्रॅगनच्या कंपन्या पुढे राहण्यासाठी एकाच रणनीतीचा वापर करतात. पश्चिमी देशातील कंपन्यांनी विकसित केलेल्या विद्यमान तंत्रज्ञानाचा पाया म्हणून वापरून स्पर्धात्मक उत्पादने विकसित करण्यात चीन माहीर झाला आहे.
फोन ते इलेक्ट्रिक वाहनांपर्यंत सर्व डिझाइन्सच्या नकला
डस्टी केनी ही अमेरिकेतील ‘प्राइमा स्टेला’ नावाच्या छोट्या कंपनीची मालक आहे. ही कंपनी लहान मुलांसाठी चमचे आणि इतर भांडी तयार करते. त्यांचे सिलिकॉन बेबी स्पून हे अॅमेझॉनवरील सर्वाधिक विक्री होणारे उत्पादन आहे, जे 7.99 डॉलर्सला विकले जाते. मात्र, काही दिवसांपूर्वी डस्टीला दिसले की चीनमधील कंपन्या तिच्या उत्पादनाच्या हुबेहूब नकला अॅमेझॉनवर 5.50 डॉलर्सला आणि अलिबाबा तसेच शीन पोर्टलवर 3 ते 4 डॉलर्सला विकत आहेत. याबाबत माहिती घेतल्यावर तिला समजले की चिनी विक्रेते अमेरिकेच्या ‘डिमिनिमिस’ नियमाचा गैरवापर करून ही उत्पादने थेट अमेरिकन ग्राहकांना पाठवतात. चीनमधील कारखाने ऑनलाइन पोर्टल्सवर मागणी असलेल्या वस्तूंच्या नकली आवृत्त्या तयार करून विकतात. विक्री केलेल्या वस्तूंवर कोणतेही शुल्क किंवा कर भरला जात नाही.
अमेरिकेतील छोटे-मोठे व्यावसायिक पुराव्यांसह सांगतात की चिनी कारखाने त्यांच्या डिझाइन्सची चोरी करून नकली उत्पादने बनवतात. अशा वस्तू खरेदी करणे ग्राहकांसाठी तोट्याचे ठरते. ती थेट चीनमधून पोस्टाने पाठवली जातात. त्यांची गुणवत्ता तपासली जात नाही, तसेच फोटोही काढले जात नाहीत. त्यामुळे ऑनलाइन दिसणारी वस्तू आणि घरी येणारी वस्तू यात फरक असतो. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे, ही उत्पादने कोणत्याही सुरक्षितता तपासणीशिवाय ग्राहकांपर्यंत पोहोचतात.
चिनी कंपन्या इतर क्षेत्रांतही तंत्रज्ञान आणि डिझाइन्सच्या नकला करण्यासाठी ओळखल्या जातात. उदाहरणार्थ, शाओमीने आयफोनच्या फीचर्सची नक्कल करून समान फीचर्सचे फोन बाजारात आणले. चीनमधील बीवायडी कंपनीने टोयोटा आणि फेरारीच्या डिझाइन्सची नक्कल करून स्वतःच्या कारमध्ये वापरली. तसेच चीनमधील हायफ सिस्टम्स लिमिटेडवर टेस्लाच्या ईव्ही बॅटरी निर्मिती प्रणाली चोरल्याचा आरोप आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत. या कंपन्या मोठ्या बाजारपेठेला लक्ष्य करतात, मोठ्या प्रमाणावर उत्पादन करतात आणि किफायतशीर खरेदी करणार्या ग्राहकांना आकर्षित करतात. यातून कमाविलेला पैसा आर अँड डी म्हणजेच संशोधन आणि नवीन तंत्रज्ञानाच्या विकासावर लावला जातो.
…पण अमेरिकन सरकार काय करत आहे?
डोनाल्ड ट्रम्प यांचे लक्ष चीनद्वारे वापरल्या जाणार्या पळवाटांकडे आहेच. सरकार डिमिनिमिस कायमस्वरूपी रद्द करण्याची रणनीती आखत आहे.
या समस्यांना भारतदेखील तोंड देत आहे का?
चीनमधून भारतातसुद्धा छोट्या वस्तू थेट ग्राहकांपर्यंत कुरिअर केल्या जातात. भारतीय सरकारने अली एक्स्प्रेस आणि शीनसारख्या शॉपिंग पोर्टल्सवर जून 2020 दरम्यान निर्बंध लादून हा प्रकार थोडाफार कमी केला असला, तरी तो संपूर्णपणे थांबलेला नाही. चीनमधून आज देखील भारतात वेबसाइट्सच्या माध्यमातून वस्तूंची विक्री होते.
चीनचा उत्पादक म्हणून सुरू झालेला प्रवास
आज जगभरात विकल्या जाणार्या विविध उत्पादनांवरील बहुतेक लेबल्स आणि टॅग ‘मेड इन चायना’ असे लिहिलेले असतात. कमी कर, कमी शुल्क, कमीतकमी पगारावर काम करणारे कुशल कामगार आणि सौम्य कामगार कायदे यामुळे जगभरातील कंपन्यांसाठी चीनमध्ये कारखाना उभारणे फायदेशीर ठरते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चीनकडे कच्च्या मालाचा मुबलक पुरवठा आणि प्रगत उत्पादन पायाभूत सुविधा आहेत. यामुळे संपूर्ण पुरवठा साखळी सुनियोजितपणे सांभाळली जाते. इतर देशातील कंपन्या चिनी उत्पादकांसोबत भागीदारी किंवा संयुक्त उपक्रम करतात. त्यांना डिझाइन्स, तांत्रिक ज्ञान आणि बौद्धिक संपदा या सर्व गोष्टी घरबसल्या मिळतात.
स्थानिक कंपन्या अशा माहितीचा उपयोग पुढे स्वतःची उत्पादने तयार करण्यासाठी करतात. पण जगभरातील अग्रगण्य कंपन्यांकडून प्रेरणा किंवा डिझाइन घेऊनही चिनी कंपन्या कायद्याच्या चौकटीबाहेर कशा राहतात? डिझाइन पेटंट्सच्या बाबतीत बोलायचे तर, प्रॉडक्टमध्ये थोडे बदल केल्याने उत्पादन कायदेशीर कक्षेबाहेर राहू शकते. किरकोळ बदलांमुळे देखील उत्पादने दुसर्याच्या डिझाइनने बनवली गेली असल्याचे सिद्ध करणे कठीण होते. विशेष म्हणजे केस झाल्यास स्थानिक कंपन्यांना चिनी न्यायालयांमध्ये फायदा मिळतो.
चीनला पुरवठासाखळीतून काढून टाकणे सोपे नाही
अॅपलसारख्या मोठ्या आणि प्राइमा स्टेला सारख्या लहान अमेरिकन कंपन्या अनेक गोष्टींसाठी जवळपास पूर्णपणे चीनवर अवलंबून आहेत. त्यांना चीनशिवाय पुरवठासाखळी आणि मॅन्युफॅक्चरिंग प्रणाली विकसित करण्यासाठी अनेक वर्षे लागतील. भारतातील परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. भारतीय स्मार्टफोन उत्पादक 60 टक्क्यांहून अधिक पार्ट्स चीनमधून आयात करतात. अगदी पार्ट्स जोडण्यासाठी वापरले जाणारे गोंददेखील शेजारील ड्रॅगन देशातून येतो. यावर अवलंबित्व कमी करण्यासाठी इतर देशांशी राजकीय संबंध सुधारण्याची तसेच प्रचंड गुंतवणुकीची आवश्यकता आहे.





