लक्षवेधी : एफएमसीजी क्षेत्रातील छोटे खेळाडू

– हेमंत देसाई
मोठ्या कंपन्या आपली अनेक होम व पर्सनल केअर उत्पादने छोट्या पॅक्समध्ये आणत आहेत. उत्पादनांच्या किमतींत सातत्याने वाढ होत असल्या कारणाने ग्राहक स्वस्त पर्याय शोधत आहेत.
एफएमसीजी, म्हणजेच फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स हे भारतीय अर्थव्यवस्थेतील चौथे सर्वात मोठे क्षेत्र आहे. डिटर्जंट्स, साबण, टॉयलेटरीज, डेंटल क्लीनर, सौंदर्यप्रसाधने, शीतपेये, चॉकलेट्स, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स आणि वेष्टनबद्ध खाद्यपदार्थ अशा अनेक क्षेत्रांचा त्यात समावेश होतो. सहा वर्षांपूर्वी एफएमसीजी बाजारपेठेची वार्षिक उलाढाल 23 अब्ज डॉलर्स इतकी होती. ती 2025 मध्ये 220 अब्ज डॉलर्सपर्यंत विस्तारेल, अशी अपेक्षा आहे.
म्हणजेच अवघ्या सहा वर्षांत नऊ-दहापट विस्तार होत आहे. आणखी पाच वर्षांत एफएमसीजीच्या विक्रीत ई-कॉमर्स खरेदीचा वाटा 11 टक्के असेल, असा अंदाज आहे. बदलती जीवनशैली, दरडोई उत्पन्नातील वाढ, शहरांचा विस्तार आणि परदेशी ब्रँड्स तसेच गॅजेट्समध्ये जनतेला असलेली वाढती रुची यामुळे या उत्पादनांची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भारत हा तरुणांचा देश असून, समाजमाध्यमे व डिजिटल व्यवहार यामुळेदेखील नवनवीन वस्तूंचा प्रभाव तरुण मनांवर पटकन होतो आणि ऑनलाइनच्या माध्यमातून झटपट खरेदी केली जाते.
आयटीसी, वरुण बेव्हरेजेस, गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, नेस्ले इंडिया या कंपन्या शेअर बाजारात सतत चमकत असतात. गेल्या दहा वर्षांत एफएमसीजी उद्योगातील महसूल सरासरी 21 टक्क्यांनी वाढत आहे. याव्यतिरिक्त ग्रामीण भागात 14-15 टक्क्यांनी महसुलात वाढ होत आहे. एफएमसीजीच्या एकूण बाजारपेठेचा 45 टक्के महसुली हिस्सा हा खेड्यापाड्यांतून येतो.
ग्रामीण भागातील लोकांनाही वेष्टनबद्ध आणि चकचकीत उत्पादनांची भूल पडली आहे. शिवाय अर्थव्यवस्थेतील महिलांचा सहभाग वाढला आहे. तसेच महाराष्ट्रासारख्या काही राज्यांत लाडकी बहीण योजना राबवली जात असल्यामुळे, महिलांच्या हातात खर्च करण्याजोगे उत्पन्न आलेले आहे. एफएमसीजीमध्ये कार्यरत असलेल्या बहुतेक कंपन्यांना उत्पादन प्रकल्प, यंत्रसामग्री, उपकरणे आणि इतर स्थिर मालमत्तांमध्ये गुंतवणुकीसाठी तुलनेने कमी भांडवलाची आवश्यकता असते.
मात्र त्याचवेळी स्पर्धकांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे, बाजारपेठेतील हिस्सा वाढवणे विविध कंपन्यांच्या दृष्टीने आव्हानात्मक होत चालले आहे. उत्पादनविकास, बाजारपेठ संशोधन आणि प्रॉडक्ट लाँच करण्यापूर्वी कराव्या लागणार्या जाहिरांतीवरील खर्च मोठा असतो. या सर्व पार्श्वभूमीवर, एफएमसीजी बाजारपेठ विषयक ताज्या अहवालानुसार, बाजारातील छोटे खेळाडू उत्तम कामगिरी करू लागले आहेत. डिसेंबर 2024 मध्ये संपलेल्या तिमाहीत या छोट्या कंपन्यांच्या उलाढालीत 14 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या पाच तिमाहींमधील ही सर्वाधिक वाढ आहे.
या उलट मागच्या तिमाहीत एफएमसीजी क्षेत्रातील बड्या कंपन्यांची उलाढाल सुमारे साडेचार टक्क्यांनीच वाढली. त्यांची एकूण उलाढाल या काळात पाच हजार कोटी रुपयांची झाली. याचा अर्थ, बड्यांच्या तुलनेत छोट्यांनी बाजारात चांगलीच मुसंडी मारलेली दिसते. खाद्यपदार्थ आणि खाद्यपदार्थेतर क्षेत्रात लहान कंपन्यांची कामगिरी सरस आहे. याचे कारण, छोट्या कंपन्यांच्या उत्पादनांच्या किमती तुलनेने कमी आहेत. त्यामुळे त्यांच्या मालाच्या विक्रीतही लक्षणीय वाढ झालेली आहे.
भारतातील एफएमसीजी बाजारपेठेतील 46 टक्के हिस्सा हा बड्या कंपन्यांनी व्यापलेला आहे. तर त्यांना टक्कर देणार्या छोट्या कंपन्यांचा वाटा हा 17 टक्के इतका आहे. आपला उत्पादनखर्च वाढलेला असूनही, त्याप्रमाणात आपल्याला किमती वाढवणे शक्य होत नसल्याचे नेस्ले इंडिया, ब्रिटानिया इंडस्ट्रीज यासारख्या कंपन्यांकडून सांगण्यात येत आहे. नूडल्स असोत अथवा बिस्किटे, त्याच्या उत्पादनक्षेत्रात तुफान स्पर्धा आहे. तर हिंदुस्तान युनिलिव्हर आणि गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स यासारख्या कंपन्या आपली अनेक होम व पर्सनल केअर उत्पादने छोट्या पॅक्समध्ये आणत आहेत. उत्पादनांच्या किमतींत सातत्याने वाढ होत असल्या कारणाने ग्राहक स्वस्त पर्याय शोधत आहेत.
भारतातील अनेक लहान लहान शहरांमध्ये त्या त्या ठिकाणची बिस्किटे, आईस्क्रिम्स वा नूडल्सचे प्रॉडक्ट्स बाजारात असतात. त्या त्या शहरातील लहान कंपन्यांची ही उत्पादने लोकप्रियही असतात. एकेकाळी पुण्यात साठे बिस्किट्सचा बोलबाला होता. डोंगरे बालामृतसारखे अनेक ब्रँड्स लोकप्रिय होते. अनेकदा मोठ्या ब्रँड्सशी साधर्म्य साधत, काही छोट्या कंपन्या आपली उत्पादने बाजारात आणतात.
मोठ्या विशेषतः बहुराष्ट्रीय कंपन्यांचा जाहिरातींवरचा खर्च तुफान असतो. शाहरूख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन, रणवीर सिंग, आलिया भट अशा कलावंतांना किंवा सचिन तेंडुलकर वा विराट कोहली यासारख्या क्रिकेटपटूंना काही कोटींमध्ये मानधन देऊन, जाहिराती केल्या जातात. समाजमाध्यमांवरून जाहिराती करण्यासाठी फार मोठे बजेट राखून ठेवलेले असते. शेवटी हा खर्च ग्राहकांकडूनच वसूल केला जात असतो.
आज देशात केंद्र सरकार स्टार्टअप्सना उत्तेजन देत आहे. त्याचप्रमाणे लहान कंपन्यांनाही पाठबळ पुरवत आहे. ग्राहकांनीही केवळ झगमगीत जाहिरातींना न भुलता, एफएमसीजीमधील छोट्या छोट्या कंपन्यांची उत्पादने विकत घेतल्यास त्या कंपन्याही उद्या मोठ्या बनू शकतील आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांना टक्कर देतील.





