दखल : ट्रॉफी हंटिंगचा प्रश्न कायम!

– स्वप्निल श्रोत्री
हत्तींच्या शिकारीवर घातलेली बंदी बोत्स्वानाने उठवली, यास एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र, प्राण्यांची शिकार करणे कितपत योग्य आहे, हा मुद्दा आजही महत्त्वाचा ठरतो.
जगाच्या इतिहासात अनेकदा युद्धे व वादविवाद निर्माण झाले आहेत आणि भविष्यातही होतील; परंतु मागील वर्षी जर्मनी आणि बोत्स्वानामध्ये सुरू झालेले रणकंदन हे कोणत्याही राजकीय किंवा आर्थिक कारणांमुळे नव्हते तर हत्तींमुळे निर्माण झाले होते. बोत्स्वाना हे राष्ट्र आफ्रिका खंडाच्या दक्षिणेला भूवेष्टित राष्ट्र (ज्याच्या सर्व बाजू जमिनीने वेढलेल्या आहे) आहे. बोत्स्वानाच्या दक्षिणेला दक्षिण आफ्रिका, पश्चिम आणि उत्तरेला नामिबिया, ईशान्येला आणि पूर्वेचा काही भागात झिम्बाब्वे या राष्ट्रांनी वेढलेला आहे.
आफ्रिका खंड हा गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या अस्थिर आहे. येथे मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी, दहशतवाद, राजकीय अनागोंदी अशा समस्या आहेत. अशा परिस्थितीत बोत्स्वानाचे हे राष्ट्र आफ्रिकेत असूनही राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या इतर राष्ट्रांपेक्षा बर्यापैकी स्थिर आहे. हत्ती आणि इतर वन्यजीवांना मानवाप्रमाणे राष्ट्रांच्या सीमा समजत नाहीत. त्यामुळे ते अन्न, पाणी आणि निवार्याच्या शोधात अनेकदा एका देशातून दुसर्या देशात स्थलांतर करीत असतात. आफ्रिका खंड राजकीयदृष्ट्या कायमच अस्थिर आहे. परिणामी, येथे गुन्हेगारी, तस्करी, दहशतवाद अशा समस्या आहेत.
हत्ती हे वन्यजीवांमध्ये मोडत असले तरी ते बौद्धिकदृष्ट्या इतर प्राण्यांपेक्षा बरेच प्रगत आहे. भूवेष्टित असल्यामुळे आजूबाजूच्या प्रदेशातून हत्ती अन्न, पाणी आणि शांततेच्या शोधात बोत्स्वानामध्ये स्थायिक होण्यास नव्वदच्या दशकात सुरुवात झाली. पुढे हे प्रमाण वाढत आज बोत्स्वानाच्या 5 लाख 81,730 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आणि 24 लाख 17 हजार लोकसंख्या असलेल्या प्रदेशात 1 लाख 20 हजार हत्ती वास्तव्य करीत आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर हे प्रमाण काढले तर एक किलोमीटर क्षेत्रात साधारणपणे चार ते पाच हत्ती आज बोत्स्वानामध्ये आहेत.
बोत्स्वानाच्या जमिनीचा 70 टक्के भाग कलहारी वाळवंटात येत असल्यामुळे उरलेला 30 टक्के भाग जो राहण्यायोग्य आहे तेथेही हत्तींची घनता मोठ्या प्रमाणावर आहे. मोठ्या संख्येमुळे हत्ती हे अनेकदा शेतांची नासधूस करतात, लोकांच्या घरांमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करतात. हत्तींच्या वाढत्या दहशतीमुळे बोत्स्वानाचे लोक अंधार होण्याच्या आत आपले सर्व व्यवहार आटोपून घरी जाणे पसंत करतात. परिणामी, बोत्स्वानाच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम मागील काही काळापासून दिसून येत आहेत.
हत्तींच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बोत्स्वानामध्ये सरकारने अनेक उपाययोजना केल्या. सरकारने 500 हत्ती मोझांबिकला भेट म्हणून दिले. 8 हजार हत्ती 2022 मध्ये अंगोलाला भेट म्हणून दिले आणि काही हत्ती आजूबाजूंच्या राष्ट्रांनासुद्धा भेट म्हणून दिले. तरीसुद्धा बोत्स्वानामध्ये हत्तींची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. परिणामी, हत्तींच्या वाढत्या संख्येवर उपाय म्हणून सरकारने 2024 मध्ये हत्तींच्या शिकारीवर घातलेली बंदी उठविली आणि वादाला सुरुवात झाली.
विविध राष्ट्रातील राजघराण्यातील लोक, श्रीमंत, उद्योगपती, खेळाडू, चित्रपट अभिनेते हे आपली शिकारीची आवड जोपासण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे मोजण्यास तयार असतात. परंतु, त्यांच्या स्वतःच्या आणि इतर राष्ट्रांमध्ये असलेल्या पर्यावरणविषयक कायद्यांमुळे त्यांना त्यांची आवड जोपासता येत नाही. अशावेळी ट्रॉफी हंटिंगचा पर्याय अशा लोकांसाठी आनंदाची पर्वणी ठरतो. ट्रॉफी हंटिंगमध्ये पैसे देऊन कायदेशीर पद्धतीने प्राण्यांची शिकार केली जाते. ट्रॉफी हंटिंगसाठी विशेष प्रकारचा परवाना सरकारकडून काढला जातो. ज्या प्राण्याची शिकार करायची आहे तो प्राणी आणि ती जागा निश्चित केली जाते. यासाठी मोठ्या प्रमाणावर सरकारकडून शुल्क आकारले जाते.
थोडक्यात, ट्रॉफी हंटिंगमध्ये सरकार पैशाच्या मोबदल्यात त्यांच्या राष्ट्रात प्राण्यांची शिकार करण्याची परवानगी देते. शिकारीसाठी कोणता प्राणी असेल आणि त्यांची संख्या किती असेल हेसुद्धा सरकार ठरविते. हत्तींच्या शिकारीसाठी बोत्स्वानामध्ये जाणार्या लोकांमध्ये जर्मनीचे लोक सर्वात पुढे आहेत. परिणामी, जर्मन सरकारने आपल्या नागरिकांसाठी जारी केलेल्या संदेशात हत्तींची शिकार करणे योग्य नसल्याचे आणि त्यांचे पर्यावरणाच्या दृष्टीने असलेले महत्त्व स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. हत्तींच्या त्रासाने आधीच वैतागलेल्या बोत्स्वानाच्या सरकारने जर्मन सरकारला विरोध करून जर्मन नागरिकांना हत्तींची शिकार करू द्या अन्यथा 20 हजार हत्ती तुमच्या दारात आणून सोडतो, अशी धमकी दिली होती. त्यातूनच जर्मनी विरुद्ध बोत्स्वाना वादाला सुरुवात झाली होती.
भारतामध्ये प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी वन्यजीव (सुरक्षा) अधिनियम, 1972 हा कायदा लागू आहे. सदर कायद्यात एकूण पाच प्रकारच्या याद्या देण्यात आल्या असून यादीनुसार प्राण्याची शिकार केल्यास तुरुंगवास आणि दंड ठरलेला आहे. प्राण्यांची शिकार आणि दंड हे पहिल्या तीन याद्यांसाठी असून तुरुंगवासाचा कालावधी आणि दंडाची रक्कम यादीनुसार बदलत जाते. चौथ्या यादीत काही झाडांची नावे दिली आहेत जी उगविणे, लावणे, वाढविणे, संगोपन करणे यांवर कायद्याने बंदी आहे. साधारणपणे यामध्ये अंमलीपदार्थांशी संबंधित आणि विषारी झाडांचा समावेश होतो.
पाचवी यादी ही ‘वर्मिन’ प्रकारात मोडते. या यादीत कोणता प्राणी टाकायचा याचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारकडे आहे. वर्मिन यादीत टाकलेल्या प्राण्यांची शिकार कायद्याने करता येते. उदा. 2018-19 या काळात बिहार राज्य सरकारने नीलगायींच्या त्रासाला कंटाळून त्यांना काही काळासाठी वर्मिन म्हणून जाहीर केले होते. ट्रॉफी हंटिंग हा कायमच वादाचा विषय राहिला आहे. विविध राष्ट्रातील पर्यावरणप्रेमी जनता, सामाजिक संघटना आणि प्राणिमात्रांवर प्रेम करणार्या संघटना यांनी ट्रॉफी हंटिंगच्या विरोधात अनेकदा आंदोलने केली आहेत. कोरोना महामारीच्या काळात पाकिस्तानने सौदीच्या राजघराण्यातील काही सदस्यांना ट्रॉफी हंटिंगसाठी पाकिस्तानमध्ये आमंत्रित केले होते.
साधारणपणे ट्रॉफी हंटिंगमध्ये असे प्राणी निवडले जातात ज्यांची संख्या त्या राष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आहे किंवा ते प्राणी उपद्रवी झाले आहेत. परंतु, पाकिस्तानने सौदीच्या राजघराण्याला खूश करण्यासाठी ‘ग्रेट इंडियन बस्टर्ड’ ह्या पक्ष्याची शिकार करण्यासाठी निमंत्रण दिले होते. ग्रेट इंडियन बस्टर्ड हा पक्षी जगातील सर्वात मोठा उडणारा पक्षी असून तो लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. संपूर्ण जगभर त्याच्या संवर्धनासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असताना पाकिस्तानने काही पैशांच्या मोबदल्यात अशा पक्ष्याची शिकार करू दिल्याने जगभरातून पाकिस्तानवर टीका झाली होती.





