नोंद : तरुणांमधील सुरक्षा संस्कृती
सुरक्षा संस्कृती (Safety Culture) ही अपघात टाळण्यासाठीची यंत्रणा नसून जबाबदार नागरिक घडविण्याचे एक प्रभावी माध्यम आहे.

– दिलीप गोलांडे
Safety Culture : सुरक्षा संस्कृती (Safety Culture) ही अपघात टाळण्यासाठीची यंत्रणा नसून जबाबदार नागरिक घडविण्याचे एक प्रभावी माध्यम आहे.
आजचा तरुण हा देशाच्या भविष्यातील सर्वात मोठा आधारस्तंभ आहे. शिक्षण, तंत्रज्ञान, उद्योग, व्यवसाय, संशोधन आणि विविध क्षेत्रांमध्ये तरुण पिढी मोठ्या आत्मविश्वासाने पुढे जात आहे. मात्र, या प्रगतीसोबत एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे सुरक्षिततेची (Safety Culture) जाणीव आणि सुरक्षा संस्कृती.
सुरक्षा ही केवळ कारखान्यात काम करणार्या कामगारांसाठी, बांधकाम क्षेत्रासाठी किंवा धोकादायक उद्योगांसाठी आवश्यक असलेली बाब नाही. सुरक्षितता ही आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. रस्त्यावर वाहन चालवताना, रेल्वेने किंवा बसने प्रवास करताना, महाविद्यालयात प्रयोगशाळेत काम करताना, घरात विद्युत उपकरणांचा वापर करताना प्रत्येक ठिकाणी सुरक्षिततेचा संबंध येतो.
सुरक्षा संस्कृती (Safety Culture) म्हणजे नेमके काय?
सुरक्षा संस्कृती म्हणजे केवळ नियमांची यादी किंवा सूचना फलक नव्हे. अपघात होऊ नये म्हणून काळजी घेणे एवढाच त्याचा अर्थ नाही. सुरक्षितता ही आपल्या विचारसरणीचा आणि दैनंदिन वर्तनाचा भाग बनणे म्हणजे सुरक्षा संस्कृती.
उदाहरणार्थ, दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे हे पोलिसांच्या भीतीपोटी न करता स्वतःच्या जीवनाची किंमत जाणून घालणे, वाहन चालवताना मोबाइलचा वापर न करणे, सिग्नल तोडू नये असे वाटणे, विद्युत उपकरण हाताळताना योग्य काळजी घेणे, धोकादायक परिस्थिती दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता संबंधित व्यक्तीला सांगणे ही सुरक्षा संस्कृतीची साधी उदाहरणे आहेत.
तरुण पिढीमध्ये याची विशेष गरज
तरुण वयात आत्मविश्वास आणि ऊर्जा मोठ्या प्रमाणात असते. नवीन गोष्टी करून पाहण्याची इच्छा असते. ही सकारात्मक बाब आहे; परंतु काही वेळा अतिआत्मविश्वासामुळे किंवा मला काही होणार नाही या मानसिकतेमुळे धोका पत्करला जातो.
रस्ते अपघात हे त्याचे एक गंभीर उदाहरण आहे. वेगाने वाहन चालवणे, हेल्मेट किंवा सीट बेल्टचा वापर न करणे, वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे किंवा संदेश पाहणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे या गोष्टी क्षणिक वाटल्या तरी त्यांचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागू शकतात.
आज सोशल मीडियाच्या युगातही सुरक्षिततेचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एखादा व्हिडिओ तयार करण्यासाठी धोकादायक ठिकाणी जाणे, रेल्वे किंवा उंच इमारतींच्या ठिकाणी सेल्फी घेणे, वाहन चालवताना रेकॉर्डिंग करणे किंवा इंटरनेटवर पाहिलेली एखादी धोकादायक कृती अनुकरण करणे हे सर्व गंभीर धोके निर्माण करू शकतात.
भारतातील अपघाती मृत्यू
नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो (NCRB) यांच्याAccidental Deaths and Suicides in India – 2024 (ADSI 2024) या अहवालानुसार, 2024 मध्ये देशात 4 लाख 67 हजार 857 अपघाती मृत्यू नोंदवले गेले. 2023 मध्ये ही संख्या 4 लाख 44 हजार 104 होती. म्हणजेच एका वर्षात अपघाती मृत्यूंच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली.
यामध्ये रस्ते व वाहतूक अपघात हे अपघाती मृत्यूंचे प्रमुख कारण ठरले. वाहतूक अपघातांमध्ये 1 लाख 99 हजार 443 जणांचा मृत्यू, तर 4 लाख 51 हजार 597 जण जखमी झाले. एकूण अपघाती मृत्यूंपैकी सुमारे 43.4% मृत्यू वाहतूक अपघातांमुळे झाले.
सुरक्षा शिक्षणाची सुरुवात कुठून व्हावी?
सुरक्षा संस्कृतीची सुरुवात शाळा आणि महाविद्यालयातून झाली पाहिजे. विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासक्रमातील विषयांचे ज्ञान देणे पुरेसे नाही. जीवनातील सुरक्षित निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणेही शिक्षणाचा भाग असायला हवे.
महाविद्यालयांमध्ये नियमितपणे Road Safety, Fire Safety, Electrical Safety, First Aid, Disaster Management, Cyber Safety आणि Emergency Response यांसारख्या विषयांवर प्रात्यक्षिकांसह कार्यक्रम घेता येतील.
फक्त व्याख्यान देऊन सुरक्षा संस्कृती निर्माण होत नाही. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये काय करावे हे अनुभवातून शिकवणे आवश्यक आहे. अग्निशामक यंत्राचा वापर कसा करायचा, आपत्कालीन परिस्थितीत इमारतीतून सुरक्षितपणे बाहेर कसे पडायचे, अपघात झाल्यास प्रथमोपचार कसा करायचा किंवा रस्त्यावर अपघात झालेला दिसल्यास कोणती प्राथमिक पावले उचलायची या गोष्टींचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देते.
सुरक्षिततेची जबाबदारी केवळ सुरक्षा अधिकारी, पोलीस, शिक्षक किंवा पालकांची नाही. प्रत्येक व्यक्तीची आहे. एखाद्या मित्राने हेल्मेट न घालता दुचाकी चालवण्याचा निर्णय घेतला तर त्याला तुझी इच्छा असे म्हणण्याऐवजी हेल्मेट घाल असे सांगण्याची संस्कृती निर्माण झाली पाहिजे. मित्र चुकीच्या पद्धतीने वाहन चालवत असेल तर त्याला थांबवणे हे मैत्रीला धक्का नसून खरी मैत्री आहे.
यासाठी Stop Think Act Safely हा साधा विचार तरुणांनी अंगीकारला पाहिजे. कोणतेही काम करण्यापूर्वी क्षणभर थांबायचे, त्यातील संभाव्य धोका ओळखायचा आणि त्यानंतर सुरक्षित पद्धतीने कृती करायची. सुरक्षा संस्कृती निर्माण करण्यात पालक आणि शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मुलांना केवळ काळजी घे असे सांगण्यापेक्षा स्वतः सुरक्षित वर्तन करून दाखवणे अधिक प्रभावी ठरते.
पालक स्वतः वाहन चालवताना सीट बेल्ट वापरत असतील, हेल्मेट घालत असतील आणि वाहतुकीचे नियम पाळत असतील तर त्याचा परिणाम मुलांवर नक्कीच होतो. त्याचप्रमाणे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचे महत्त्व त्यांच्या दैनंदिन जीवनाशी जोडून समजावून सांगितले पाहिजे.
सुरक्षित तरुण म्हणजे सुरक्षित समाज
एका तरुणाने सुरक्षिततेची (Safety Culture) सवय लावून घेतली तर त्याचा फायदा केवळ त्याला होत नाही. त्याचे कुटुंब, मित्र, सहकारी आणि पुढील पिढीही त्याचा फायदा घेते. आजचा विद्यार्थी उद्याचा अभियंता, डॉक्टर, शिक्षक, उद्योजक, अधिकारी किंवा कामगार असेल. तो ज्या ठिकाणी काम करेल तेथे त्याची सुरक्षा विचारसरणी पोहोचेल.






