अग्रलेख : संस्कृती आणि रक्षक
सिंहगडावर बर्म्युडा परिधान करून आलेल्या एका लहान मुलीच्या वडिलांना काही तथाकथित संस्कृती (Culture) रक्षकांनी मारहाण केल्याचा विषय सध्या गाजत आहे.

Culture : सिंहगडावर बर्म्युडा परिधान करून आलेल्या एका लहान मुलीच्या वडिलांना काही तथाकथित संस्कृती (Culture) रक्षकांनी मारहाण केल्याचा विषय सध्या गाजत आहे. या विषयावर उलट सुलट चर्चा होत असतानाच सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा येथे नागपंचमी यात्रेदिवशी नागराजांच्या मिरवणुकीमध्ये महिलारूपी नागिणींनी जो बिभत्स नाच केला होता त्याची चर्चाही रंगू लागली आहे.
सांगली जिल्हा प्रशासनाने याची दखल घेऊन संबंधित नागराज मंडळांवर जरी कारवाई केली असली, तरी या निमित्ताने संस्कृती आणि संस्कृती (Culture) रक्षकांची मानसिकता निश्चितच समोर येताना दिसत आहे. लवकरच दहीहंडीसारखा एक मोठा उत्सव होणार आहे. त्यानंतर गणेशोत्सव साजरा केला जाईल. महाराष्ट्रीय संस्कृतीचे प्रातिनिधिक रूप असलेल्या या उत्सवांनी गेल्या काही वर्षांमध्ये घेतलेले जे रूप आहे ते पाहता या दोन्ही उत्सवांमध्येही ते तथाकथित संस्कृती रक्षक आपली भूमिका पार पाडणार आहेत का, याबाबत मात्र उत्सुकता आहे.
कारण दहीहंडी उत्सव असो किंवा गणेशाचे आगमन आणि विसर्जन सोहळा असो, त्यावेळी ज्या मिरवणुका निघतात त्यालासुद्धा आता वेगळे वळण लागले आहे. कोणताही दहीहंडी उत्सव एखाद्या सेलिब्रिटी कलावंताच्या विशेषतः महिला कलावंताच्या उपस्थितीशिवाय पार पडत नाही. दहीहंडी कार्यक्रमाला लोकांची गर्दी व्हावी म्हणून अनेक वेळा नृत्य करणार्या महिलांनाही पाचारण केले जाते. असाच प्रकार गणेशोत्सवातही पाहायला मिळतो.
एकीकडे महाराष्ट्राची संस्कृती (Culture) असलेली लेझीम, ढोल ही पारंपरिक वाद्य बाजूला पडून आवाजाची अवाढव्य भिंत उभी करून लोक बहिरे होतील अशा प्रकारे जी एक यंत्रणा वापरली जाते त्याबाबत बोलण्यासाठी संस्कृती रक्षक तयार नाहीत हा विरोधाभासही लक्षात घ्यायला हवा. सुप्रीम कोर्टाने किंवा इतर कोणत्याही यंत्रणेने कितीही आदेश दिले तरी गणेश मिरवणूक किंवा दहीहंडीसारख्या उत्सवामधील डीजे आणि डॉल्बीचा दणदणाट कमी होत नाही.
एखादा उत्सव यशस्वी झाला याचे मापदंड म्हणून ह्या भीषण आवाजाकडे आणि इतर गैरप्रकारांकडे जर पाहिले जात असेल, तर या उत्सवातील खर्या संस्कृतीचा सर्वांनाच विसर पडला आहे, असे म्हणावे लागते. बहिरेपणाला आणि हृदयविकाराला कारणीभूत ठरणार्या या आवाजाच्या ठणठणाटाला अनेक वेळा स्थानिक राजकीय पुढारी यांचाच आशीर्वाद लाभलेला असतो हेसुद्धा लक्षात घ्यावे लागते.
गणेशोत्सवपूर्व गणेश मंडळांच्या बैठका ज्या झाल्या त्या बैठकांमध्ये अनेक शहरांमध्ये गणेश मंडळांनी डॉल्बी आणि डीजे वाजवण्याची परवानगी देण्याची मागणी केली हे विशेष आहे. एकीकडे ज्येष्ठ नागरिक संघटना असो किंवा डॉक्टरांच्या संघटना असो किंवा काही एनजीओ असोत आवाज प्रदूषण कमी करण्यासाठी डीजे आणि डॉल्बीसारख्या आवाजाच्या यंत्रणा वापरू नयेत अशी मागणी करत असताना गणेश मंडळांना मात्र त्यापासून बाजूला जाता येत नाही ही निश्चितच खेदजनक बाब आहे.
सिंहगडावर एका लहान मुलीच्या कपड्यांवर लक्ष ठेवून विनाकारण राडा करणारे तथाकथित संस्कृती रक्षक अशा मोठ्या उत्सवांमध्ये होणार्या गैरप्रकाराबाबत का बोलत नाहीत या प्रश्नाचे उत्तरही त्यांनी द्यायला हवे. नागपंचमी, दहीहंडी किंवा गणेशोत्सव हे सण आनंदाने आणि समाधानाने साजरा करण्याचे सांस्कृतिक उत्सव आहेत. हे सण साजरे केल्यावर सर्वांनाच समाधान मिळावे अशी अपेक्षा असते. पण प्रत्यक्षात तसे घडताना दिसत नाही.
गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये अभ्यास करणारे विद्यार्थी किंवा एखाद्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले रुग्ण किंवा ज्येष्ठ नागरिक किंवा नवजात अर्भक यांना आवाजाचा आणि एकूणच प्रक्रियेचा किती त्रास होतो याचा विचार संबंधित मंडळे करतात का, या विषयाचे पण संशोधन करण्याची गरज आहे. लोकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असलेल्या सार्वजनिक उत्सवांना गेल्या काही वर्षांमध्ये चुकीचे वळण मिळाले आहे. ते दुरूस्त करण्याबाबत कोणीच बोलत नाही.
कोणत्याही संस्कृतीला एक परंपरा असते आणि त्या परंपरेचे आदर्शपणे पालन केल्यामुळेच त्या संस्कृतीला नाव मिळालेले असते. गेल्याकाही काळापासून चालू असलेल्या विविध सार्वजनिक उत्सवाची सद्यस्थिती लक्षात घेतली तर सध्या हे उत्सव ज्या प्रकारे साजरे केले जात आहेत अशी कोणतीही परंपरा आढळत नाही.
साहजिकच गणेशोत्सव, नागपंचमी, दहीहंडी उत्सव साजरा करणे ही जर परंपरा असेल तर त्या परंपरेला योग्य संस्कृतीची जोड मिळणेसुद्धा गरजेचे असते. पण दुर्दैवाने गेल्या काही वर्षांत या उत्सवांमध्ये जे बदल झाले त्या बदलांनाच परंपरा आणि संस्कृती मांडण्याचा जो गैरसमज मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे, त्यातूनच आधुनिक काळातील संघर्ष आणि समस्याही वाढत आहेत.
नागपंचमी, दहीहंडी किंवा गणेशोत्सव यासारखे उत्सव साजरे करणे जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच हे उत्सव आदर्शपणे सादर करणे महत्त्वाचे आहे हे कोणत्या संबंधिताने विसरता कामा नये. महाराष्ट्रातील तथाकथित संस्कृती (Culture) रक्षकांनीसुद्धा निवडक पद्धतीने आपले काम चालू ठेवता कामा नये. एकट्या दुकट्या माणसावर आपली सांस्कृतिक दहशत निर्माण करण्याऐवजी सार्वजनिक उत्सवांना योग्य वळण मिळावे, यासाठी हे संस्कृती रक्षक काही करणार आहेत की नाहीत, हे पाहणे जास्त महत्त्वाचे आहे.






