दखल : पुणे-नाशिक रेल्वे?
पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प (Pune-Nashik Railway) आर्थिक, कृषी, औद्योगिक, पर्यटन आणि सामाजिक दृष्टीने महत्त्वाचा आहे. परंतु पुणे-नाशिक रेल्वे स्वप्नातून वास्तवात कधी अवतरणार आहे?

– विशाल महाराज गडगे
Pune-Nashik Railway : पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प (Pune-Nashik Railway) आर्थिक, कृषी, औद्योगिक, पर्यटन आणि सामाजिक दृष्टीने महत्त्वाचा आहे. परंतु पुणे-नाशिक रेल्वे स्वप्नातून वास्तवात कधी अवतरणार आहे?
महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करताना पायाभूत सुविधांना केंद्रस्थानी ठेवावे लागते. रस्ते, रेल्वे, विमानतळ आणि दळणवळणाच्या सुविधा या केवळ प्रवास सुलभ करणार्या नसतात, तर उद्योग, शेती, व्यापार, पर्यटन आणि रोजगाराला (Pune-Nashik Railway) चालना देणार्या विकासवाहिन्याही असतात. त्यामुळे कोणताही मोठा पायाभूत प्रकल्प हा खर्च नसून भविष्यातील प्रगतीसाठीची गुंतवणूक असते.
पुणे-नाशिक रेल्वेमार्ग (Pune-Nashik Railway) हा अशाच महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे. मात्र, अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला हा प्रकल्प आजही प्रत्यक्षात मार्गी लागलेला नाही. परिणामी, उत्तर पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक विभागाच्या विकासाला मोठा विलंब सहन करावा लागत आहे.
पुणे आणि नाशिक ही महाराष्ट्रातील दोन प्रमुख आर्थिक केंद्रे आहेत. पुणे हे माहिती-तंत्रज्ञान, शिक्षण, वाहननिर्मिती आणि संशोधनाचे केंद्र आहे, तर नाशिक कृषी, द्राक्ष निर्यात, वाइन उद्योग, संरक्षण उत्पादन आणि धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. या दोन शहरांदरम्यान व्यापार, उद्योग आणि प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत असताना थेट रेल्वे संपर्काचा अभाव प्रकर्षाने जाणवतो.
त्यामुळे रस्ते वाहतुकीवरील ताण, अपघात, इंधनाचा वाढता खर्च आणि वेळेचा अपव्यय सातत्याने वाढत आहे. या रेल्वेमार्गाचा सर्वाधिक लाभ जुन्नर, आंबेगाव, खेड, चाकण, संगमनेर आणि अकोले या भागांना होणार आहे. उत्तर पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील हा संपूर्ण पट्टा कृषी, दुग्धव्यवसाय आणि फलोत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
कांदा, टोमॅटो, डाळिंब, भाजीपाला, फुले, दूध आणि इतर कृषी उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती येथे होते. रेल्वेमुळे वाहतूक खर्च कमी होईल, नाशवंत मालाचे नुकसान टळेल आणि शेतकर्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपर्यंत अधिक वेगाने पोहोचता येईल. कोल्ड स्टोरेज, वेअरहाउस, कृषी प्रक्रिया उद्योग, लॉजिस्टिक पार्क आणि दुग्धप्रक्रिया उद्योगांना चालना मिळाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ मिळेल.
औद्योगिक विकासाच्या दृष्टीनेही हा रेल्वेमार्ग (Pune-Nashik Railway) अत्यंत महत्त्वाचा आहे. चाकण औद्योगिक वसाहत देशातील सर्वात मोठ्या वाहननिर्मिती आणि अभियांत्रिकी उद्योगकेंद्रांपैकी एक आहे. रेल्वे संपर्क उपलब्ध झाल्यास उद्योगांच्या मालवाहतुकीचा खर्च कमी होईल, निर्यात क्षमता वाढेल आणि नवीन गुंतवणुकीला चालना मिळेल. भविष्यात पुणे-चाकण-जुन्नर-संगमनेर-नाशिक हा संपूर्ण पट्टा महाराष्ट्रातील महत्त्वाचा औद्योगिक आणि कृषी आर्थिक कॉरिडॉर म्हणून विकसित होऊ शकतो.
पर्यटनाच्या दृष्टीनेही हा रेल्वेमार्ग अत्यंत उपयुक्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ला, लेण्याद्री व ओझरचे अष्टविनायक, नाणेघाट, भीमाशंकर, माळशेज घाट, भंडारदरा, कळसूबाई, हरिश्चंद्रगड, रंधा धबधबा आणि सह्याद्रीतील अनेक पर्यटनस्थळांना देशभरातून लाखो पर्यटक भेट देतात. रेल्वे उपलब्ध झाल्यास या भागातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल. स्थानिक हॉटेल व्यवसाय, वाहतूक सेवा, ग्रामीण पर्यटन, हस्तकला आणि लघुउद्योजकांना त्याचा थेट लाभ होईल.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासमोर खोडद येथील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (Giant Metrewave Radio Telescope) हे एक महत्त्वाचे आव्हान आहे. जगातील अग्रगण्य रेडिओ दुर्बिणींपैकी एक असलेल्या या संशोधन केंद्रामुळे भारताला खगोलशास्त्र क्षेत्रात जागतिक प्रतिष्ठा मिळाली आहे.
विद्युतीकृत रेल्वेमार्गामुळे निर्माण होणार्या विद्युतचुंबकीय लहरींचा संशोधनावर परिणाम होऊ शकतो, अशी वैज्ञानिकांची भूमिका आहे. या चिंतेचा आदर करणे आवश्यक आहे. मात्र, हा प्रश्न ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (Giant Metrewave Radio Telescope) की रेल्वे?’ असा नसून ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (Giant Metrewave Radio Telescope) आणि रेल्वे दोन्ही कसे सुरक्षित राहतील?’ असा आहे. आधुनिक तंत्रज्ञान, अभियांत्रिकी उपाय आणि वैज्ञानिक समन्वयाच्या माध्यमातून दोन्ही उद्दिष्टे साध्य करणे शक्य आहे.
दरम्यान, रेल्वेमार्ग मूळ आराखड्यापासून वळविण्याच्या निर्णयामुळे जुन्नर, आंबेगाव, खेड, संगमनेर आणि परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. कारण मार्ग बदलल्यास उत्तर पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील लाखो नागरिक विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहतील. त्यामुळे पुणे-नाशिक रेल्वेमार्ग मूळ मंजूर आराखड्यानुसारच व्हावा, हीच या भागातील जनतेची ठाम भूमिका आहे.
याच मागणीसाठी पुणे-नाशिक रेल्वे कृती समितीच्या माध्यमातून जनजागृती, बैठका आणि व्यापक लोकआंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. क्रांतीदिनी महामार्ग रोको आंदोलनाची हाक देण्यात आली असून, विविध पक्षांचे कार्यकर्ते, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होत आहेत.
हा संघर्ष कोणत्याही वैज्ञानिक संस्थेविरोधात किंवा व्यक्तीविरोधात नसून, विकासातील समान न्यायासाठी आणि भावी पिढ्यांच्या हितासाठी आहे. पुणे-नाशिक रेल्वेमार्ग हा केवळ लोहमार्ग नाही; तो उत्तर पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक विभागाच्या विकासाचा जीवनमार्ग आहे. शेतकर्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ, उद्योगांना नवी ऊर्जा, विद्यार्थ्यांना सुलभ प्रवास, पर्यटनाला नवी दिशा आणि लाखो युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याची क्षमता या रेल्वेमार्गात आहे.
त्यामुळे शासन, रेल्वे मंत्रालय, राज्य सरकार, वैज्ञानिक संस्था, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक यांनी संवादातून सर्वमान्य तोडगा काढणे ही काळाची गरज आहे. विज्ञान आणि विकास हे परस्परविरोधी (Pune-Nashik Railway) नाहीत, तर परस्परपूरक आहेत. जीएमआरटीचे जागतिक महत्त्व अबाधित ठेवत, कोणत्याही भागावर अन्याय न करता आणि जनभावनांचा आदर राखत पुणे-नाशिक रेल्वेमार्ग मूळ मंजूर मार्गानेच तातडीने पूर्ण करणे, हीच आज महाराष्ट्राच्या सर्वांगीण आणि संतुलित विकासाची खरी गरज आहे.






