दखल : अवकाशातील लढाईची तयारी

– व्ही. के. कौर
अवकाशस्थानकं स्थापनेची विविध देशांमध्ये स्पर्धा सुरू आहे. पण यामागचा छुपा उद्देश अवकाशातील लढाईची तयारी तर नाही ना, अशी तज्ज्ञांना शंका वाटत आहे.
अवकाशात स्थापन केलेल्या अवकाशस्थानकाच्या माध्यमातून भविष्यात काही देशांकडून क्षेपणास्त्र हल्ले होण्याची शक्यता पाहता भारतदेखील अवकाश क्षेत्रात पावले टाकताना दिसत आहे. आपण इतरांपेक्षा अधिक काळ मागे नाही. पुढील दहा वर्षांत स्वत:च्या अवकाशस्थानकात स्वत:चे अंतराळवीर उतरवण्याची शक्यता आहे. यासाठी भारतीय शास्त्रज्ञांचे प्रयत्न शेवटच्या टप्प्यात आहे. एकुणातच ही मोहीम दहा वर्षांत तडीस पोचू शकते आणि अवकाशात देखील भारत यशाचे शिखर पादाक्रांत करू शकतो.
आत्मनिर्भरच्या दृष्टीने वाटचाल करताना जमिनीपासून हजारो किलोमीटर अंतरावर अवकाशात भारताचे स्वत:चे स्थानक असेल. भारतीय अवकाश संस्था ‘इस्रो’कडून 2035 पर्यंत अवकाशात स्वत:चे स्पेस स्टेशन स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. भविष्यात एखादा अंतराळवीर अवकाशात प्रवास करेल तेव्हा तो स्वत:च्याच अवकाशस्थानकात उतरेल.
अर्थात, जगातील शक्तिशाली देश अवकाश क्षेत्राला प्राधान्य का देत आहेत? ते सातत्याने नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याच्या मागे का लागले आहेत? कदाचित भविष्यात अवकाशस्थानकाच्या माध्यमातून क्षेपणास्त्रे डागण्याची योजना तर आखत नाही ना? अशा प्रकारचे प्रश्न तज्ज्ञांच्या मनात उपस्थित होत आहेत. अर्थात, प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. कारण सध्याच्या काळात बहुतांश देश जमिनीऐवजी आकाशातून संघर्ष करत आहेत. समोरासमोरची लढाई टाळत क्षेपणास्त्रे डागली जात आहेत. इराण इस्रायल, गाझा, पॅलेस्टिन, युक्रेन-रशिया आणि अलीकडचे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव हे त्याचेच उदाहरण आहे. म्हणूनच आगामी संघर्षाच्या ठिणग्या अवकाशात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आतापर्यंत दोन देशातील संघर्ष हा आपण जमीन, हवा आणि पाणी यावरच पाहिले. परंतु भविष्यातील लढाई अवकाशातून लढली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गोष्टी आश्चर्यकारक वाटू शकतात, परंतु तसे घडण्याची शक्यता अधिक वाटू लागली आहे.
अवकाशस्थानकात युद्धासंदर्भात शास्त्रज्ञांनी काही शोध लावले असून त्यासंबंधीचे काम अनेक दशकांपासून सुरू आहे. आतापर्यंत अवकाशात दोनच स्थानकं आहेत. पहिले ‘इंटरनॅशनल स्पेस स्टेशन’ आणि ते अमेरिका आणि रशिया याच्या संयुक्त प्रयत्नातून आकारास आले. तर दुसरे स्थानक चीनचे असून ते खासगी आहे. अर्थात, आता रशिया, अमेरिका, भारत आणि अन्य एक देश आपापले खासगी स्थानक तयार करण्याच्या शेवटच्या टप्प्यात पोचले आहेत.
पुढील दहा वर्षांत भारताबरोबरच रशियादेखील स्वत:चे स्थानक स्थापन करेल. त्याचा उद्देश हा अवकाशातील प्रयोग करण्याचा असला तरी या माध्यमातून काही उपग्रहांना क्षेपणास्त्र हाताळण्यासाठी कामाला लावले जाण्याची शक्यता आहे. तूर्त 41 वर्षांनंतर शुभांशु शुक्ला यांच्या रूपातून भारताचा एक अंतराळवीर अवकाशात जाऊन आला. त्यांच्या अवकाश प्रवासाचे माध्यम अॅक्सिओम मिशन-4 का असेना, परंतु भविष्यात परकी यानावरचे अवलंबित्व संपण्याची शक्यता आहे. चीनच्या मालकीचे असणार्या खासगी अवकाश स्थानकाच्या दिशेने भारतदेखील जवळपास पोचला आहे.
2009 मध्ये अमेरिकेने रशियासमवेत एक करार केला आणि त्यात स्वत:चे अवकाशस्थानक तयार करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाचे महत्त्व आता लक्षात येत आहे. स्वत:चे खासगी अवकाश स्थानकाच्या माध्यमातून अमेरिका अवकाशातून क्षेपणास्त्र लढाई करण्याची योजना आखत आहे. अवकाशात देखील दबदबा निर्माण करू इच्छित आहे. पृथ्वीपासून अवकाशस्थानक गाठण्यासाठी 28 तास लागतात. एवढ्या मारक क्षमतेचे क्षेपणास्त्र अमेरिका तयार करत आहे. अवकाशात 24 तासांत 16 वेळेस सूर्योदय होतो आणि 16 वेळेस सूर्यास्त होतो.
90-90 मिनिटांचा दिवस आणि रात्र असते. अवकाश स्थानक 24 तासांत पृथ्वीला सुमारे 16 वेळेस प्रदक्षिणा घालते. उपग्रह क्षेपणास्त्राचा वापर अवकाशातून कसा केला जाईल यावर ‘नासा’कडून बर्याच काळापासून अभ्यास सुरू आहे. इस्रो आणि नासाचे शास्त्रज्ञ हे अवकाशात मानवी जीवन, ऑक्सिजन, पाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भात चाचपणी करत आहे. परंतु पुढचे पाऊल वर्ष 2035 मध्ये स्वत:चे अवकाश स्थानक स्थापन करण्याबरोबरच 2040 पर्यंत चंद्रावर मानवाला उतरविण्याचे आहे. यासाठी मिशन ‘गगनयान’ लाँचची घोषणा करण्यात आली आहे.
या माहिमेतील शास्त्रज्ञांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. अवकाशातून परतलेले शुभांशु यांची केवळ उड्डाणापुरतीच मोहीम नव्हती, तर ती एक भारतीय अवकाश संशोधनाच्या नव्या युगाची सुरुवात म्हणता येईल. आगामी गगनयान मोहिमेला आतापर्यंतची सर्वात मोठी मोहीम असल्याचे ‘इस्रो’ने मानले असून त्यासाठी अनेक वर्षांपासून आपले चारशे अवकाश शास्त्रज्ञ काम करत आहेत.





