लक्षवेधी : ग्रेट ब्रिटनमध्ये चीनची घुसखोरी

– हेमंत महाजन
इंटेलिजन्स अँड सिक्युरिटी कमिटी ऑफ ब्रिटिश पार्लमेंट, या ब्रिटिश सरकारच्या एका महत्त्वाच्या संस्थेने नुकताच एक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार चीनने ब्रिटनमधील सर्वच क्षेत्रात घुसखोरी केल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.
इंटेलिजन्स अँड सिक्युरिटी कमिटी ऑफ ब्रिटिश पार्लमेंट, ही ब्रिटिश सरकारची एक महत्त्वाची संस्था आहे, जी प्रत्येक वर्षी ग्रेट ब्रिटन समोर असलेल्या सुरक्षा आव्हानाविषयी आपला रिपोर्ट प्रकाशित करते. ही कमिटी युनायटेड किंग्डमच्या वेगवेगळ्या गुप्तहेर शाखा म्हणजे एमआय फिफ्टीन, एमआय सिक्सटीन आणि इतरांच्या कामाची देखरेख करते.
नुकताच या कमिटीने एक रिपोर्ट प्रकाशित केला आहे की, चीन मोठ्या प्रमाणात ग्रेट ब्रिटनच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये घुसखोरी करून ब्रिटिश सुरक्षेला एक धोका निर्माण करत आहे. ब्रिटनला किती धोका आहे हे समजूनसुद्धा ब्रिटनमधल्या ब्रिटन विरोधी चिनी कारवायांवरती सरकारकडून पुरेसे लक्ष ठेवले जात नाही.
हा रिपोर्ट चीनच्या ब्रिटिश सुरक्षेला असलेल्या धोक्याची गंभीरता दर्शवितो. कमिटीने निदर्शनास आणले आहे की, चीनने अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, विद्यापीठे, संशोधन आणि विकास या क्षेत्रातल्या घुसखोरीमुळे ब्रिटनच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.
चीन सरकार ब्रिटिश सरकारवर दबाव आणण्यासाठी अनेक मार्गांचा वापर करत आहे. उदाहरणार्थ, ब्रिटनने चिनी कंपन्यांना गुंतवणूक करण्यास नकार दिल्यास, त्यांच्या चीनमधील व्यवसायांवर प्रतिबंध घालण्याची धमकी दिली आहे. चीनने ब्रिटिश सरकारला चीन-विरोधी केलेल्या कारवायांवर माघार घेण्यास देखील भाग पाडले आहे. या धोक्याचे काही संभाव्य परिणाम खालीलप्रमाणे आहेत-
चीन ब्रिटिश संशोधन आणि विकास क्षमतांना हानी पोहोचवत आहे. चीन ब्रिटिश सरकार आणि उद्योगांवर दबाव आणत आहे. चीन ग्रेट ब्रिटनच्या राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक प्रणालींमध्ये घुसखोरी करत आहे. चीन ग्रेट ब्रिटनच्या कंपन्यांना आणि संशोधन संस्थांना हॅक करत आहे. चीन ग्रेट ब्रिटनच्या सुरक्षा आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना धमकावत आहे. चीन नागरिकांना हेरगिरी आणि मन वळवण्याचे प्रयत्न करत आहे. ब्रिटिश नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करत आहे. यामुळे चीन ब्रिटिश सार्वभौमत्वाला धोका निर्माण करत आहे.
हेरगिरीसाठी अनेक पद्धतींचा वापर
या अहवालात चीन ब्रिटनमध्ये हेरगिरी करत असलेल्या अनेक पद्धतींचा उल्लेख करण्यात आला आहे. चिनी गुप्तचर संस्थांनी अनेक ब्रिटिश नागरिकांशी संपर्क साधणे, ब्रिटिश कंपन्यांना धमकी देणे, ब्रिटिश सरकारच्या संवेदनशील माहितीला हॅक करणे असे अनेक उद्योग सुरू केले आहेत. चिनी सरकार ब्रिटिश कंपन्यांवर आर्थिक हल्ला करून ब्रिटिश अर्थव्यवस्थेला धोका निर्माण करत आहे. यामध्ये चिनी सरकारने ब्रिटिश कंपन्यांना निधी देणे, ब्रिटिश कंपन्यांना अधिग्रहित करणे आणि ब्रिटिश कंपन्यांशी स्पर्धा करणे यांचा समावेश आहे.ब्रिटिश अर्थव्यवस्था, ब्रिटिश विद्यापीठे, ब्रिटिश सरकार यामध्ये घुसखोरी करून चीन ब्रिटनच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करत आहे. चीन घुसखोरी करून ब्रिटिश धोरणांना प्रभावित करत आहे, ब्रिटिश सैन्याची माहिती चोरत आहे.
ब्रिटिश राजकारणात हस्तक्षेप
चीन ब्रिटिश राजकारणात हस्तक्षेप करून ब्रिटिश राजकीय व्यवस्थेला धोका निर्माण करत आहे. चीन ग्रेट ब्रिटनमधील काही राजकीय पक्षांना आर्थिक मदत करून आणि ब्रिटिश राजकारण्यांना भेट देऊन खूश करत आहे. चिनी सरकारने ब्रिटिश राजकीय पक्षांना निधी देणे, ब्रिटिश राजकीय नेत्यांना प्रभावित करणे आणि ब्रिटिश सरकारची धोरणे चीनच्या बाजूने वळवणे यांचा समावेश आहे. यामुळे अनेक चीनला सोयीस्कर अशी भाषा बोलतात, चिनी कामे करतात आणि ब्रिटिश राष्ट्रीय हितांकडे दुर्लक्ष करतात.
ब्रिटिश अर्थव्यवस्थेत घुसखोरी
चीन ब्रिटिश अर्थव्यवस्थेत घुसखोरी करत आहे. चीनने ब्रिटिश कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक करून त्याचे रूपांतर चिनी कंपनींमध्ये केले आहे. ब्रिटिश बाजारपेठेत आपले उत्पादन चीन मोठ्या प्रमाणत विकत आहे. यामुळे ब्रिटिश कंपन्या स्पर्धेत मागे पडल्या आहे.
ब्रिटिश तंत्रज्ञान क्षेत्रात घुसखोरी
चीनने ब्रिटिश तंत्रज्ञान क्षेत्रात घुसखोरी करून त्यांचे तंत्रज्ञान चोरले आहे. चीनने ब्रिटिश कंपन्यांना चिनी तंत्रज्ञानाचा वापर करण्यास लावले आहे. यामुळे ब्रिटिश तंत्रज्ञान उद्योगाला आणि ब्रिटिश सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. चीन ग्रेट ब्रिटनमधील अनेक विद्यापीठांना आर्थिक मदत करून आणि ब्रिटिश संशोधकांना चीनमध्ये संशोधन करण्याची संधी देऊन खूश करत आहे. चीन ब्रिटिश विद्यापीठांमध्ये घुसखोरी करून ब्रिटिश विद्यार्थ्यांना प्रभावित करत आहे. शिवाय ब्रिटिश विद्यापीठांमधून संशोधन, शोधनिबंध चोरत आहे. यामुळे ब्रिटिश संस्कृतीवर चीनचा प्रभाव वाढत आहे आणि ब्रिटिश नागरिक त्यांच्या स्वतःच्या संस्कृतीपासून दूर जात आहेत.
अधिक उपाय करणे आवश्यक
एके काळी ग्रेट ब्रिटनने सगळ्या जगावरती राज्य केले होते. आजसुद्धा युनायटेड नेशन्स सेक्युरिटी काउन्सिलमध्ये त्यांच्याकडे व्हेटोचा अधिकार आहे. ग्रेट ब्रिटन “नाटो’ या जगातल्या सर्वात शक्तिशाली मिलिटरी अलायन्सचा भाग आहे. असे असूनसुद्धा ग्रेट ब्रिटनला चिनी घुसखोरी थांबवण्यामध्ये यश मिळालेले नाही.
यामुळे चीन वर्षातले 365 दिवस मल्टी डोमेन युद्ध ब्रिटनच्या विरोधात लढत आहे आणि या युद्धाचा मुकाबला करण्याकरता ब्रिटनची ताकद कमी पडत आहे. चीनने घुसखोरी केल्यामुळे अनेक ब्रिटिश नागरिक, राजकीय पक्ष, संस्थांचे मतपरिवर्तन झाले आहे, प्रचंड आर्थिक ताकदीला बळी पडून, ते आता चीन जे म्हणेल ते ऐकायला तयार आहे.
भारताने काय शिकावे?
ग्रेट ब्रिटन समोर असलेल्या चिनी धोक्यापासून भारतही बरेच काही शिकू शकतो. भारताला विविध क्षेत्रांमध्ये चिनी घुसखोरी कमी करण्यामध्ये बऱ्यापैकी यश मिळालेले आहे. मात्र भारतीय कॉर्पोरेट जगतसुद्धा चिनी आर्थिक चक्रव्युहामध्ये अडकले आहे. भारत सरकारने वेळोवेळी इशारे देऊनसुद्धा ते चीनवरती असलेले आपले अवलंबत्व कमी करण्याचे पुरेसे प्रयत्न करायला तयार नाहीत. चीनकडून होणारी आयात कमी करायला त्यांच्यावरती दबाव टाकणे जरुरी आहे. चिनी सप्लाय चेन आपल्याला कधीपण धोक्यात आणू शकते. चीन साम, दाम, दंड, भेद याचा वापर करून भारतावरतीसुद्धा अधिपथ बनवण्याच्या सतत प्रयत्न करत राहील. याकरता वेळोवेळी चीन भारताविरुद्ध करत असलेल्या कारवायांचे विश्लेषण करून, या कारवायांना कशाप्रकारे प्रतिउत्तर द्यायची याचा अभ्यास केला जावा आणि विविध क्षेत्रांमध्ये त्याचे प्रत्युत्तर दिले जावे, नाहीतर ग्रेट ब्रिटनला असलेला धोका भारतालासुद्धा होऊ शकतो.





