आमदार, खासदारांचा नव्हे आता बीडीओंचा जनता दरबार

दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी बीडीओ घेणार जनता दरबार
नगर – तालुक्यातील जनतेच्या तक्रारी सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी सकाळी 11 वाजता गटविकास अधिकाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयात बैठक आयोजित करावी असे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले आहेत.
सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी आता जनता दरबार सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी होणाऱ्या या जनता दरबारात जनतेच्या तक्रारी,गाऱ्हाणी, अडचणी सोडविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या जनता दरबारात ग्रामपंचायत तसेच पंचायत समितीमध्ये आलेल्या लेखी तक्रारीतील सर्व तक्रारदारांना सभेपूर्वी आठ दिवस आधी माहिती देण्यात येणार आहे. या दरबारात होणाऱ्या कार्यवाहीचा तपशील संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर करावा लागणार आहे. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्ह्यातील सर्व पंचायत समितींचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करतील व विभागीय आयुक्त महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ग्रामविकास मंत्रालयांना हा अहवाल सादर करतील.





